सकाळ-सकाळी जीएमसीबाहेर संघर्ष! विक्रेत्यांसह रामराव वाघ, रामा काणकोणकरही पोलिसांच्या ताब्यात

जाब विचारण्यासाठी गेले असता ताब्यात घेतलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जीएमसी बाहेर असलेल्या फळविक्रेत्यांसह गाडे लावणाऱ्यांवर पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. नवी जागा न दिल्यानं आणि आधीच्यांना डावलून नव्या लोकांना आधीच जागा दिल्यानं विक्रेते आणि पोलिस यांच्यात तणाव पाहायला मिळाला. सोमवारी सकाळी जीएमसीबाहेर असलेल्या परिसराला त्यामुळे छावणीचं स्वरुप आलं होतं. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही यावेळी पाहायला मिळाला.

काय झालंय?

सोमवारी सकाळी जीएमसी बाहेर असलेल्या विक्रेत्यांना पोलिसांच्या मदतीनं हटवण्यात आलं. यावेळी रामराव वाघ आणि रामा काणकोणकर यांनी याबाबत पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विक्रेत्यांचे असलेले गाडे याआधीही हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दुसरीकडे जागा देण्यात येईल, असं आश्वासनही देण्यात आलेलं.

दरम्यान, नव्यांना जागा देण्यात आली, मात्र जे विक्रेते आधीपासून या ठिकाणी होते, त्यांचं पुनर्वसन झालेलं नसल्यानं त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. यावेळी स्थानिक नेत्यांसह निदर्शनं करणाऱ्या विक्रेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

1 जुलैलाही पहाटेच झाली होती कारवाई

बांबोळीतल्या जीएमसीबाहेरील अवैध गाडे दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 1 जुलैलाही पहाटे हटवण्यात आले होते. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून कडेकोट बंदोबस्तात गाड्यांतील सामान जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर गाडे हटवण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला होता. यामुळे गाडे व्यावसायिकांत खळबळ माजली होती.

त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी जीएमसीला विश्वासात घेऊन गाडेवाल्यांना नव्याने जागा देण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं सांगितलं होतं. तसंच जे मूळ गोमंतकीय फळे विक्रेते आहेत त्यांना नव्यान जागा देणार असून आम्हाला कुणाचाच व्यवसाय बंद करायचा नाही, असंही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते. दरम्यान, आता पुन्हा झालेल्या कारवाईनं जीएमसीबाहेरील विक्रेत आणि प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्यताय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!