निष्ठावंत आणि नवनिष्ठांचे मांद्रेत जोरदार शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संयमी व्यवस्थापन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मांद्रे मतदारसंघ दौरा बराच वादळी ठरला. मांद्रेतील जुने निष्ठावंत आणि नवनिष्ठावंतांच्या शक्तीप्रदर्शनाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागला. एकाच पक्षाच्या दोन गटांकडून एकमेकांविरोधात नाराजी आणि टीकेचा झोड उठवला जात असतानाच आपल्या कुशल संयमी नेतृत्वाच्या बळावर मुख्यमंत्र्यांनी हा दौरा शांत पद्धतीनं हाताळला. हा दौरा आटोपून मुख्यमंत्र्यांनी सुटका करून घेतली खरी परंतु भाजपातील अंतर्गत संघर्षाची ठिणगी मांद्रेतून पडल्याने भविष्यात समान आव्हानाचा सामना पक्षाला करावा लागणार आहे.

हेही वाचाः आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

पार्सेकरांची आक्रमकता

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मंगळवारी मांद्रे मतदारसंघ दौरा निश्चित झाला होता. तत्पूर्वी सोमवारी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना बोलावून त्यांना या दौऱ्याची कल्पना दिली होती. या दौऱ्यात आमदार या नात्याने सोपटेंचा मान राखणं जेवढं गरजेचं होतं तेवढंच महत्व पार्सेकरांचाही अपमान होणार नाही, याची काळजी घेण्याचं होतं. पार्सेकर आणि सोपटे यांना एकत्र आणून एकाच व्यासपीठावर बसवण्याची त्यांची मध्यस्ती अपयशी ठरल्यानंतर अखेर पार्सेकरांनी वेगळं स्वागत हरमल येथे करण्याचं ठरवलं.

सोपटे यांनी आपल्या स्वागताचा कार्यक्रम हरमल येथेच वेगळ्या सभागृहात आयोजित केला होता. या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही गटांतील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना एकून घेतल्या. कुठल्याही तऱ्हेने वादाला संधी मिळणार नाही याची काळजी घेत मुख्यमंत्र्यांनी सावध वक्तव्य करत दोघांनाही सांभाळून घेण्याचे कसब आजच्या या दौऱ्यात केलं

पूर्वसंध्येलाच अपशकुन

मंगळवारी मुख्यमंत्र्यांचा मांद्रे मतदारसंघ दौरा असतानाच त्याच दिवशी पार्सेकरांनी आगामी विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच असे विधान करणारी बातमी वर्तमानपत्रात छापून आणली. साहजिकच या वृत्तामुळे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांत संभ्रमी वातावरण निर्माण झालं. निष्ठावंत आणि नवनिष्ठावंत असे दोन तट भाजपात पडलेत. एकीकडे आमदार दयानंद सोपटे आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे दोघेही सध्या मतदारसंघात फिरत असून भाजपच्या उमेदवारीवर दावा करत आहेत. खरं म्हणजे आगामी उमेदवारी कुणाला याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात होणं पक्षासाठी हीताचं होतं पण उमेदवारीसंबंधी आणखी संभ्रम वाढविण्याचा प्रकार घडल्याने ह्याचा फायदा पार्सेकर गटाला होणार असून सोपटे समर्थक गटात मात्र चिंतेचे वातावरण पसरणार आहे.

हेही वाचाः अखेर दिलासा, जामीन मंजूर! राणेंची रात्र जेलमध्ये जाणार नाही तर…

भाजप कार्यकर्ते अस्वस्थ

पहिल्यांदा हरमल येथे पार्सेकरांच्या हायस्कूलात कार्यकर्त्यांच्या सभेला मुख्यमंत्री हजर राहिले. तिथे पार्सेकर समर्थक कार्यकर्त्यांनी आपली भडास आणि अपमानाच्या भावनांना मुक्त वाट करून दिली. पक्षाने निष्ठावंतांवर कसा अन्याय केला आणि पार्सेकरांनाच उमेदवारी का मिळायला हवी, असे युक्तीवाद करण्यात आले. ही बैठक काहीशी लांबली आणि तिकडे सोपटे समर्थक गटात अस्वस्थता पसरली. पार्सेकरांच्या बैठकीचे लाईव्ह कव्हरेज फेसबुकवरून पाहत सोपटेंवरच कशी भडास काढली जात आहे, हे सोपटेंच्या समर्थकांनी पाहीलं. तिकडेच मुख्यमंत्र्यांनी जेवण घेतलं आणि ते सोपटेंच्या सभेला पोहचले. तिथे उशिर झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज बनलेच, पण अस्वस्थही झाले. मुख्यमंत्री तिथे पोहचल्यानंतर लगेच सोपटेंच्यावतीने कार्यक्रमाला सुरूवात होताच हरमलची बैठक आणि तिथे उपस्थित झालेल्या मुद्दांवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं आवाहन करण्यात आलं.

माझंच तिकिट निश्चित नाही

भाजपात उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. आपण तिकिट जाहीर करू शकत नाही. सोपटे यांनी दिलेला शब्द पाळला आणि भाजपला मदत केली, त्यामुळे त्यांना पक्षातर्फे दगा दिला जाणार नाही. पार्सेकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे दिल्लीत वजन आहेत आणि त्यामुळे त्यांनाही पक्ष बेदखल करू शकत नाही. शेवटी उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार दिल्लीतील नेत्यांना आहे आणि तेच अंतिम निर्णय घेतील, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलं. आपलीही उमेदवारी निश्चित असल्याचा दावा आपण करू शकत नाही, असं म्हणून त्यांनी सोपटे यांच्या समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पार्सेकर किंवा सोपटे यांच्या दोन्ही सभांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं खरं, परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची दिशा काय असेल हे मात्र यातून निश्चित होऊ शकलं नाही. वास्तविक भाजप कार्यकर्ते, समर्थक आणि जनतेला भाजपच्या भवितव्याचा योग्य अंदाज येणं गरजेचं होतं, पण यातून गोंधळाला आणि अपप्रचारालाच अधिक वाव मिळण्याची शक्यता असल्याने भाजपसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.

हा व्हिडिओ पहाः MINING | अंबानी-अदानींना खाणी आंदण देण्याचा डाव!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!