दोडामार्गमध्ये होणार कडक लॉकडाऊन!

गोव्याच्या सीमेवरील पर्यायी मार्गही करणार बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : गोव्याच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात कडक लॉकडाऊन जाहीर होणार आहे. या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली असून बुधवारी अधिकृत नियमावली जाहीर करण्यात येईल.

डिचोली तालुक्याला लागून असलेल्या दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सतर्क बनलेल्या सरकारी यंत्रणेने लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरील ताण सहन करण्याच्या पलीकडे चाललाय. काही रुग्णांना उपचारांसाठी गोव्यात पाठवले खरे, पण तिकडे बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माघारी आणावे लागले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अगदीच कुचकामी असल्यामुळे रुग्णांना गोव्याचा एकमेव आधार आहे. तिथेही आता मदतीची आशा उरली नसल्यानं दोडामार्गमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

पर्यायी मार्ग होणार बंद

दोडामार्गमधून शेकडो युवक-युवती गोव्यात कामानिमित्त ये-जा करतात. मात्र लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना गोव्यात जाणारे पर्यायी मार्गही बंद करण्यात येणार असल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. सर्वपक्षीय नेते आणि सरकारी अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आलाय. त्याबाबत बुधवारी अंतिम नियमावली जारी करण्यात येणार आहे.

सात दिवसांचा असेल लॉकडाऊन

शुक्रवार दि. 9 मेपासून गुरुवार दि. 15 मेपर्यंत दोडामार्गात कडक लॉकडाऊन जारी होणार आहे. शेतकर्‍यांना दूध डेअरीवर दूध घालता येईल, पण त्यासाठी ग्रामपंचायतीचा दाखला दाखवावा लागेल. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास अनुमती असेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, तरी काही रुग्ण राजरोस फिरतात. त्यामुळे रुग्णांच्या हातावर क्वारन्टाइन आणि अनक्वारन्टाइन शिक्के मारावेत अशी सूचना शिवसेनेचे बाबुराव धुरी यांनी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!