भटक्या गुरांना उचलणार कधी?

सरकारने गुरांसाठीची योजना नव्या पद्धतीने राबविण्याची मागणी. वाहनचालकांना करावी लागते कसरत, गुरांच्या जीवितालाही धोका.

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

हरमल : भटक्या गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हरमल परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणे नित्याचेच बनले आहे. या गुरांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला असून संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज आहे.

गोव्यात सध्या कित्येक प्रमुख रस्त्यांवर भटकी गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा होतो. त्याचबरोबर मुक्या जनावरांच्या जिवासही धोका निर्माण होतो. असे होऊ नये यासाठी सरकारने गुरांसाठीची योजना नव्या पद्धतीने राबवावी, अशी मागणी सेवा दल काँग्रेस उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष प्रणव परब यांनी केली आहे.

भटकी गुरे ही सामान्य शेतकरी लोकांची आहेत. काही शेतकरी गुरांना चरण्यासाठी स्वतः घेऊन रानावनात जातात, तर कित्येक जण गुरांना माळरानावर सोडून देतात व परतीच्या वाटेकडे डोळे लावतात. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या मुक्या जनावरांना हाकलून न लावता, दुचाकी चारचाकी गाड्या बेफामपणे हाकून गुरे जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

कोंडवाड्याचा ‘कोंडवाडा’
सध्या अनेक भागांत भटक्या गुरांसाठी सरकारने पंचायतींना कोंडवाडे उभारणीसाठी निधी मंजूर केला आहे. हरमल पंचायत क्षेत्रासाठी वरचावाडा भागांत कोंडवाडा भाडेपट्टीवर घेतल्याचे ग्रामसभेत उत्तरादाखल सांगितले होते. मात्र, सरकारकडून मंजूर निधी व खर्चाचा ताळमेळ व्यवस्थित होत नसल्याने ती योजना कुचकामी ठरत असल्याचे मत नागरिकांनी ग्रामसभेत व्यक्त केले होते.

सरकारने कोंडवाड्याऐवजी प्रत्येक पंचायत क्षेत्रात दोन चार स्वयंसेवक पगारी तत्त्वांवर नेमावे. त्यांची जबाबदारी पंचायत समितीवर सोपवावी.
– प्रणव परब, उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष, सेवा दल काँग्रेस

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!