वेंगुर्ले किनारपट्टीवर वादळाचे पडसाद ; मांडवी खाडीच्या पाणी पातळीत वाढ

फोटो स्टुडिओवर झाड पडल्यानं 60 हजारांचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेंगुर्ले : शुक्रवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने व जोरदार आलेल्या वादळी वा-याने तालुक्यामध्ये ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत मीटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, वादळ सदृश परिस्थितीमुळे येथील मांडवी खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘ताऊकती‘ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १४ मे पासून सर्तकतेचा इशारा दिला होता. वेंगुर्ला तालुक्यात १४ मेच्या सायंकाळपासून विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट होत होता. मध्यरात्री मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यातच आलेल्या वादळी वा-याने झाडे पडण्याचे प्रकार घडले. वेंगुर्ला शहरामध्ये बॅ.खर्डेकर रोडवरील पुरुषोत्तम मडकईकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. याच घरालागून असलेल्या राऊळ फोटो स्टुडिओवरही सदरचे झाड पडल्याने छप्पराचे तसेच पावसाचे पाणी आत शिरल्याने संगणक, प्रिंटर व इलेक्ट्राॅनिक साहित्यासह सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, आज सकाळी वेंगुर्ला तलाठी डी.बी.गोरड, कोतवाल मालणकर यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानीची पहाणी केली. उर्वरित घटनांमध्ये दाभोली नाका येथील हकीम नर्सरीत झाडांच्या फांद्या पडून विद्युत वाहिन्या तुटल्या, मठ-टाकयेवाडी येथील सुनिता सावंत यांच्या घरावर झाड पडून नुकसान तर रावदस येथील रमेश बाळकृष्ण आंबोडसकर यांच्या घरातील विद्युत मीटर व टीव्ही विजेच्या धक्क्याने जळून सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ला-मांडवी खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने खाडी किनारी राहणा-या नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छिमारांनी आपल्या नौका खाडीत आश्रयाला आणल्या आहेत. मांडवी खाडीतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत आहे. तर बंदर परिसरात जोरदार लाटा उसळत आहेत. बंदर रोड येथे रोडला लागून संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू असून या कामात या उधाणामुळे व्यत्यय येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!