Video | कणकिरे-गुळेलीला वादळाचा तडाखा, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्यं

बागायती बसला फटका; सोळा घरांची छपरे उडाली

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपई : सत्तरीतील गुळेली, कणकिरे भागाला सोमवारी चक्रीवादळाचा फटका बसला. यामुळे या भागातील नागरिकांच्या बागायती व घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की काही दिवसांपासून गोव्यात सुरू असलेल्या पावसाचा तडाखा सोमवारी गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील कणकिरे सत्तरी गावाला बसला.

वादळी वारा, पाऊसामुळे नुकसान

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळ झालं. सोसाट्याचा वारा अचानक आल्यामुळे सगळ्यांना काही समजण्याच्या आधीच झाडांची पडझड तसंच घरांचे पत्रे कौलं वाऱ्यामुळे उडून गेली. तर माडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झालं. या वादळात बागायती आणि सोळा घरांना मोठं नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली आहे. तीस लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी बागायतीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं. मोडून पडलेली पोफळीची झाडं पाहून वादळाच्या तीव्रतेचा अंदाज येतो.

एक युवक जखमी

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या झाडांच्या पडझडीत झाडं उन्मळून पडल्याचं समजतंय. अंगावर घराचा वासा पडल्यामुळे अनिल पालकर हा युवक जखमी झाला आहे. जखमी अनिल पालकर याला वाळपई आरोग्य केंद्र प्राथमिक उपचार करुन घरी पाठवण्यात आलं. त्याला गोवा मेडीकल कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला वाळपई आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्याच्या छातली मार लागला असून टाके पडले आहेत.

प्रभाकर गावकर यांच्या बागायतीचं नुकसान

प्रभाकर गावकर यांच्या बागायतीमधील ६० सुपारीची, २५ नारळाची झाडं व केळी बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली आहे. विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी प्रभाकर गावकर यांच्या बागायतीची तसंच इतर शेतकऱ्यांच्या बागायतीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कागदपत्रे घेऊन मंगळवारी कार्यालयात बोलावलं आहे. वाळपईतील तलाठ्याकडूनही सर्वेक्षण हाती घेण्यात आलं आहे. अहवाल सरकारला सादर करून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. भागातील वीजपुरवठा गायब असून मंगळवारी वीजवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे करणार मदत

सोमवारी झालेल्या या वादळामुळे ज्या कणकिरे ग्रामस्थांचं नुकसान झालं आहे त्या सर्व ग्रामस्थांना आपण स्वखर्चाने मदत करणार असल्याचं आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या भागाचे पंच तथा गुळेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितेश गावडे यांना कळवलं असल्याचं नितेश गावडे यांनी सांगितलं.

अग्निशामक दलाकडून रात्री उशिरापर्यंत मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होतं.

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!