पर्रीकरांवर आरोप करून चूक झाली, माफ करा!

भाजपकडून 'समज' : मायकल लोबो 'ताळ्यावर'

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच मायनिंग बंदी झाली आणि गोवा माईल्सला मोकळे रान मिळाले, असा आरोप करणार्‍या मंत्री मायकल लोबोंना (Michael Lobo) भाजपने कानपिचक्या दिल्या. त्यावर, अशी चूक पुन्हा करणार नाही, अशी ग्वाही लोबो यांनी दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी सांगितले.

पर्वरी येथील विधानसभा संकुलाबाहेर ‘गोवन वार्ता लाईव्ह’शी खास बातचित करताना तानावडे यांनी ही माहिती दिली. मायकल लोबो यांनी पर्रीकर यांचे निर्णय कसे चुकीचे होते, याबाबत माध्यमांकडे बोलताना विधाने केली होती. गोव्यातील मायनिंग व्यवसाय पर्रीकरांमुळे ठप्प झाल्याचे त्यांचे ताजे विधान बरेच गाजले. त्या आधी, गोवा माईल्स आणण्यामागे पर्रीकरांचा हात होता. त्यामुळे पारंपरिक टॅक्सीवाले देशोधडीला लागले, असा आरोप लोबो यांनी केला होता. गोवा माईल्स आणण्याचा पर्रीकरांचा निर्णय चुकीचा होता, असे लोबो म्हणाले होते.

मायनिंग पर्रीकरांनीच बंद पाडले..!

गोव्याची अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून आहे, असा मायनिंग व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा मनोहर पर्रीकरांचा निर्णय चुकीचा होता, असे विधान मायकल लोबो यांनी केले होते. कुठलाही व्यवसाय पूर्णपणे बंद करणे योग्य नाही. कारण असा व्यवसाय पुन्हा सुरू करणे कठीण होते. पर्रीकरांमुळेच मायनिंग व्यवसाय बंद पडला, जो अद्याप पुन्हा सुरू करणे शक्य झालेले नाही, असे लोबो म्हणाले होते.

कारवाईची गरज नाही…

लोबो यांनी दिवंगत पर्रीकरांबाबत धक्कादायक विधाने केल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले. याची गंभीर दखल स्थानिक पक्षनेतृत्वाने घेतली. मंत्री लोबो यांना बोलावून याबाबत जाब विचारण्यात आला. तसेच असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. मायकल लोबो यांनी आपण चूक केल्याचे मान्य केले आणि पुन्हा अशी विधाने करण्याची चूक करणार नसल्याची ग्वाही दिली, असे तानावडे यांनी सांगितले. मायकल लोबो यांनी चूक कबुल केल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार नसल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

गोवा माईल्सचा निर्णय घेताना पर्रीकरांनी विश्वासात घेतलं नाही- मायकल लोबो

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!