7 दिवसांनी कर्फ्यू वाढवण्याचं सत्र कायम! आता 28 तारखेपर्यंत कर्फ्यूत वाढ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये आणखी ७ दिवस वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली आहे. सोशल मीडियामध्ये पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. लवकरच याबाबतचा अधिकृत आदेशही जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी केला जाणार आहे. दरम्यान, यावेळी देण्यात आलेल्या कर्फ्यूमधील वाढीसोबत काही प्रमाणात दिलासाही देण्यात आला आहे. यावेळी कर्फ्यूमध्ये वाढ करत असताना मासळी बाजारालाही सुरु करण्यास मुभा देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलंय की,

२८ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यूत वाढ करण्यात येत आहे. दरम्यान, शॉपिंग मॉलमधील दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी‌ असेल. मात्र सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स, एन्टरटेमेंट झोन बंदच राहणार आहेत. विशेष म्हणजे मासळी बाजारही सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मासळी बाजार खुले ठेवण्यात येणार आहेत.

रुग्णवाढ घटली, पण कर्फ्यू कायम

राज्यातील रुग्ण हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र मृत्यू होण्याचं प्रमाण अजूनही म्हणावं तसं कमी झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लाट जरी ओसरत असल्याचा दावा केला जात असला तरीही चिंता कायम आहे. अशातच कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला जोरात सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील १०० टक्के लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी वेगानं लसीकरण मोहीम राबवली जाते आहे. अशातच जोपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्यटन सुरु करणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : CCTV | बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, थरारक फाईट कॅमेऱ्यात कैद

कोरोना लसीच्या पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरण जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. अशातच अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी कर्फ्यूमध्ये वाढ करताना काही प्रमाणात शिथिलता दिली होती. यावेळी आणखी काही प्रमाणात ढिलाई देत अर्थचक्रला हातभार लावण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं अप्रत्यक्षपणे भासवलं आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी ७ दिवसांच्या कर्फ्यूमध्ये वाढ करण्याचा सिलसिली आणखी किती दिवस सुरु राहणार, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय.

हेही वाचा : रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पार! तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हेही वाचा : Photo Story | Saturday Special खास पाऊस पाणी खड्डे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!