कर्फ्यूत पुन्हा वाढ, बार आणि रेस्टॉरंटला आणखी सूट

राज्यात प्रवेश करण्याबाबत काय नवे निर्देश?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : एकीकडे कोरोना रुग्णवाढीचा मंदावलेलाल असतानाच राज्यात कर्फ्यूवाढीचं सत्र सुरुच आहे. यावेळी आणखी थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र राज्यव्यापी कर्फ्यू वाढवला असला तरिही राज्यात जनजीवन पाहता, कर्फ्यू लागू ठेवण्याचं प्रयोजन काय, असाही सवाल उपस्थित केला जातोय.

कोरोनामुळे होणारे राज्यातील मृत्यूचे सत्र अजून थांबले नसल्याने राज्यव्यापी कर्फ्यूत ९ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री जारी केला. या आदेशात बार आणि रेस्टॉरन्ट रात्री ११ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच परराज्यांतून येणाऱ्यांना विशेषतः केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक ठेवला आहे.

नव्या आदेशानुसार,

राज्यव्यापी कर्फ्यू ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत असेल. बार आणि रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. यापूर्वी ती रात्री ९ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मुभा होती. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. नव्या आदेशात काही बाबी वगळता मार्गदर्शक सूचना जुन्याच पुढे कायम ठेवण्यात आल्या आहेत.

काय सुरु? काय बंद?

सध्या केरळात करोना रुग्ण वाढत असल्याने तेथून येणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य केले आहे. तर अन्य राज्यांतून गोव्यात दाखल होताना ७२ तासांपर्यंत कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. दरम्यान, यापूर्वीचा आदेश सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू आहे. शिक्षण संस्था बंदच असल्या तरी शाळा, महाविद्यालयांना परीक्षा घेण्याची मोकळीक कायम आहे.

हेही वाचा : डेडलाईन चुकली! 31 जुलैपर्यंत गोव्यात पहिल्या डोसचं १००% लसीकरण झालंच नाही, मग झालं किती ?

कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, मल्टिप्लेक्स बंदच असतील. दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. पेट्राेल पंप, फार्मसी, इस्पितळे, गॅस सेवा पूर्वीप्रमाणेच कायम असतील. कोविडची दुसरी लाट उसळल्याने राज्यात ९ मे रोजी सर्वप्रथम राज्यव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर २४ ते ३१ मे पर्यंत त्यात वाढ देऊन दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर दर आठवड्याला कालावधी संपल्यानंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली. दरवेळी मुदतवाढ देताना काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. आताही मुदतवाढ देताना निर्बंध किंचित शिथिल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : देर आए दुरुस्त आए! गोव्यात जाण्यासाठी सिंधुदुर्गच्या गाड्यांना अखेर मुभा

टेस्ट करुनच गोव्यात यावं लागणार?

परराज्यातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांना पहिल्या कर्फ्यूपासूनच ७२ तासांचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात आरटीपीसीआर की अँटीजन चाचणी असा कोणताही उल्लेख नव्हता. रविवारी जारी केलेल्या नव्या आदेशात केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना केवळ आरटीपीसीआर चाचणीच बंधनकारक करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून येणाऱ्यांबाबत असे कोणतेही बंधन लावण्यात आलेले नाही. याबाबत आदेशात स्पष्टता नाही.

हेही वाचा : काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामनो! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीचे काँग्रेसला ३ सवाल

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!