नऊ शिक्षकांना राज्य पुरस्कार

सरकारकडून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य अशा गटांत पुरस्कार

यश सावर्डेकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील नऊ शिक्षकांना 2019-20 साठीचे राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे जाहीर केली. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य अशा गटांत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी उत्तर गोव्यातून विशेष मुलांसाठीच्या दिशा स्कूलचे शिक्षक अविनाश पारखे, तर दक्षिण गोव्यातून आगोंद येथील सरकारी शाळेच्या अमिता देसाई यांची निवड करण्यात आली आहे. माध्यमिक गटासाठी उत्तर गोव्यातून सरकारी हायस्कूल, मेणकुरे-डिचोली येथील सहाय्यक शिक्षक गोपाळ सावंत व सरकारी हायस्कूल, नगरगाव-वाळपई येथील सहाय्यक शिक्षिका नंदा माजिक यांची, तर दक्षिण गोव्यातून एस. के. के. हायस्कूल, केरी-फोंडा येथील कला शिक्षक श्रीकृष्ण वझे यांची निवड करण्यात आली आहे.

हायस्कूल पातळीवरील मुख्याध्यापक गटात उत्तर गोव्यातून सेंट झेविअर अकादमी जुने गोवे या विशेष मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका कुएल्हो, तर दक्षिण गोव्यातून सरकारी हायस्कूल, मोरपिर्ला-केपेच्या मुख्याध्यापिका मारिया मिरांडा यांची निवड करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक गटातून श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक, कोरगाव-पेडणे येथील विठोबा बगळी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

उच्च माध्यमिक प्राचार्य गटातून कोंब-मडगाव येथील श्री दामोदर उच्च माध्यमिकचे प्राचार्य राजीव देसाई यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!