मुरगाव तालुक्यासाठी पूर्णवेळ क्षेत्रीय कृषी कार्यालय सुरू करा

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्कोः गोव्याच्या आर्थिक पुनरुज्जीवन योजनेचा एका भाग म्हणून मुरगाव तालुक्यासाठी पूर्णवेळ क्षेत्रीय कृषी कार्यालय सुरू करण्याची मागणी गोवा कॅनने केली आहे. इतर तालुक्यांसाठी क्षेत्रीय कृषी कार्यालय सुरू करण्यात आलं असताना मुरगाव तालुक्याला क्षेत्रीय कृषी कार्यालयापासून का वंचित ठेवलं जातंय? असा सवाल गोवा कॅनने विचारला आहे. कृषी कार्यालय सुरू केल्यावर शेतकऱ्यांना कृषी संचालनालयाकडून शेतीसाठी यंत्रणा, बियाणी, खत सहजपणे उपलब्ध होतील जेणेकरून शेतीला चालना मिळेल, असं गोवा कॅनने म्हटलंय.
हेही वाचाः वांते पिळयेवाडा रस्त्याची मागणी अखेर पूर्ण
कृषी क्षेत्र पुनरुज्जीवन योजनेतील महत्त्वाचं क्षेत्र
गोवा सरकार आर्थिक पुनरुज्जीवन योजनेवर काम करत आहे. कोविड-19 च्या दुष्परिणामामुळे नवीन वास्तविकता समोर आल्यानं कृषी हे पुनरुज्जीवन योजनेतील महत्त्वाचं क्षेत्र म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे मुरगाव तालुक्यासाठी पूर्णवेळ विभागीय कृषी कार्यालय सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे, असं पत्र गोवा कॅनने गोवा कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोन्सो यांना लिहलं आहे.
हेही वाचाः मोरजीत 318 नागरिकांनी घेतली लस
कृषी कार्यालय नसल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय
मुरगाव तालुक्यात कृषी कार्यालय नसल्यानं शेतकऱ्यांना निरनिराळ्या गैरसोयींना तोंड द्यावं लागतंय. मुरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खत, सेंद्रिय खत आणि यंत्रसाम्रगी खरेदी करण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे त्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होत असल्याचं पत्रात स्पष्ट केलं आहे. मुरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही मदत न घेता पदरमोड करून मडगावात खत खरेदीसाठी जाणं भाग पडतंय. जर सरकारने त्यांना खत दिलं, तर ते भाजीपाला पिकवू शकतात. या हंगामात शासनाने आवश्यक ती मदत दिल्यास नुकसानग्रस्त शेतकरी त्या गोष्टींचा लाभ घेऊन भात लागवड करू शकतील, असं वृत्त प्रसिद्ध झाल्यानं गोवा कॅनने चौकशी सुरू केली. तेव्हा मुरगाव तालुक्यात क्षेत्रीय कृषी कार्यालय नसल्यानं शेतकऱ्यांना सदर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं.
हेही वाचाः पिसुर्लेत चिरेखाणीत महिलेची आत्महत्या
मुरगाव तालुक्यात कृषी कार्यालय का नाही?
गेल्या तीन दशकांपासून मुरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी कार्यक्रम, योजना इत्यादींसाठी सासष्टी तालुक्यातील कृषी कार्यालयामध्ये जावं लागतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्याने स्थापित झालेल्या धारबांदोडा तालुक्यात स्वतंत्र कृषी कार्यालय आहे. मात्र गोव्यातील सर्वात जुन्या मुरगाव तालुक्यामध्ये कृषी कार्यालय नाही. मुरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मडगावात एक काळजीवाहू विभागीय कृषी कार्यालय आहे, असं गोवा कॅनचं म्हणणं आहे.
हेही वाचाः उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदावर शोबित सक्सेना यांची बदली
कृषी कार्यालयासाठी आमदार, खासदारांनी प्रयत्न करण्याची गरज
मुरगाव तालुक्यात कृषी कार्यालय स्थापन करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे दक्षिण गोव्याचे खासदार, स्थानिक आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, मुरगाव पालिका, ग्रामपंचायती सदस्यांनी कृषी कार्यालय स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतीस चालना मिळाल्यास सेंद्रिय खत खरेदी, सुरक्षित आणि पौष्टिक आहाराची मागणी वाढेल, असा आशावाद गोवा कॅनने व्यक्त केला. मुख्य सचिव, कृषी सचिव, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, पंचायतींचे संचालक, नगरपालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार व मुख्य महाव्यवस्थापक (गोवा प्रादेशिक कार्यालय) नाबार्ड यांना गोवा कॅनने पत्राच्या प्रती पाठवल्या आहेत, असे गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी सांगितलं.