मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कॅसिनो सुरू करावेत

गोवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविडचा संसर्ग आता पूर्ण अटोक्यात आहे. शिवाय लसीकरणालाही वेग आला आहे. यामुळे पर्यटनाला गती देणे शक्य आहे. या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कामगारांचा आणि अन्य व्यावसायिकांचा विचार करता, पर्यटनात मोठा वाटा असलेला कॅसिनो व्यवसाय हळूहळू सुरू करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शक तत्त्व जारी करून सरकारने तसा निर्णय घ्यावा, असं मत गोवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी व्यक्त केलें आहे.

हेही वाचाः बेपत्ता रुद्रेश सापडला; आईवडिलांनी मानले पोलिसांचे आभार

यामुळे पर्यटनाशी निगडित व्यवसाय सुरू करण्यास अडचण नाही

शिक्षण संंस्था, कॅसिनो, मसाज पार्लर हे व्यवसाय वगळात आता राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. बारसुद्धा आता रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. राज्यव्यापी कर्फ्यू लागू असला तरी अनेक व्यवसाय सुरू करण्यास नियम शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्यास गत सोमवारी मुभा देण्यात आली आहे. यामुळे पर्यटनाशी निगडित व्यवसाय सुरू करण्यास अडचण नाही, असे मत पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कॅसिनो सुरू करावेत

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, कॉलरा यासारखे साथीचे आजार पसरत असतात. त्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. कोविडची लस आली आहे. त्यामुळे करोना झाला तरी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेले अथवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असलेले पर्यटक गोव्यात सहज येऊ शकतात. तशी सरकारनेच परवानगी दिली आहे. आता हंगामही जवळ आला आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कॅसिनो सुरू करावेत. आवश्यकता असल्यास कॅसिनोत प्रवेश करताना आणखी कडक चाचणीची तरतूद करावी. कॅसिनो सुरू करण्यास परवानगी दिली तरी लगेच तिथे गर्दी होणार नाही, असं धोंड यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः ऑनलाईन शिक्षणामुळे मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासाला खीळ

यामुळे बेरोजगारीत आणखी भर

राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. करोनामुळे अन्य व्यवसायांनाही फटका बसला आहे. पर्यटन व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले कॅसिनो व हॉटेलसारखे अन्य व्यवसायही बंद आहेत. यामुळे बेरोजगारीत आणखी भर पडत आहे. ही स्थिती आणखी किती काळ उरेल, हे सांगता येत नाही. या सर्व बाबींचा विचार केला असता पर्यटनाला चालना देणारे कॅसिनोसह सर्वच व्यवसाय लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे, असं मत हॉटेल्स व कॅसिनो व्यवसायातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचाः भाजपविरोधी आघाडीच्या काँग्रेसकडून हालचाली!

अनुकूल वातावरण निर्मिती आवश्यक!

– करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध, यामुळे उद्योग जगताचे मोठे नुकसान होत आहे. राज्यातील पर्यटन तर पूर्णपणे बंदच आहे. ते सुरू झाल्यानंतर लगेच पर्यटक गर्दी करणार नाही. त्यांच्यातील भीती कमी झाल्यानंतर हळूहळू त्यांची संख्या वाढत जाईल.
– सरकारने आतापासूनच पर्यटनासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज आहे. कोणतीही गोष्ट दीर्घकाळ बंद राहिल्यास ती लगेच पूर्वपदावर येऊ शकत नाही. पर्यटनाचीही तीच गत आहे.
– पर्यटन सुरू झाल्यानंतर कॅसिनो सुरू झाल्यास टॅक्सी व्यावसायिक व अन्य हॉटेल्सवाले यांचा व्यवसाय सुरू होईल. शहरातील अन्य दुकानदार व बार व्यवसायही सुरू होईल.

हा व्हिडिओ पहाः Crime | Murder | रशियन तरुणीच्या हत्येचं नेमकं कारण काय?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!