COVID UPDATE | HOME ISOLATION SOP | घरी विलगीकरणात असलेल्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वं

कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्वात महत्त्वाचे बदल

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता राज्य आरोग्य यंत्रणेने कंबर कसलीये. कुठलाच कोविड रुग्ण उपचाराविना राहू नये याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कोरोना-19 नियमावलीत महत्त्वाचे बदल केलेत. त्याचबरोबर रुग्णालयातील अपुऱ्या खाटा, ऑक्सिजनची कमतरतेमुळे रुग्णांचा होणारा मृत्यू इ.वर आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा नवनवीन उपाय योजनांचा अवलंब करतेय. घरी विलगीकरणात असलेल्यांसाठी सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आलीत.

हेही वाचाः हलगर्जीपणा! कोविड पॉझिटिव्ह असूनही पोहोचला फार्मासीत

अहवालाच्या प्रतीक्षेत असलेल्या सिंम्प्टमेटिक/असिंम्प्टमेटिक रुग्णांसाठी उपचार नियमावली (प्रवासी वगळता):

कोविड अहवाल येईस्तोवर स्वतःला स्वतंत्र ठेवावं (घरातच राहा), स्वतंत्र खोलीत राहावं आणि स्वतंत्र शौचालय वापरावं. दिवसातून किमान 3 वेळा शरिराचं तापमान तपासावं. एसपीओ2 (पल्स-ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सिजन सॅच्युरेशन) दिवसातून 3 वेळा तपासावं. दिवसातून दोनदा 6 मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावा, म्हणजे, एसपीओ 2 तपासावं आणि रिडिंग्सची नोंद करावी. त्यानंतर खोलीच्या आत सामान्य गतीने 6 मिनिटं चालावं आणि पल्स-ऑक्सीमीटरवर पुन्हा रिडिंग तपासावं. जर सहा मिनिटं चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणं सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा 3 टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटं चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखं वाटत असेल, तर त्या जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क करावा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतंत्रपणे जेवावं. एकत्र जेवणं टाळावं. कुटुंबातील सर्वांनी पूर्ण वेळ मास्क वापरावा. मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार, दमा इत्यादी आरोग्य परिस्थितीसाठी औषधं सुरू ठेवावी.

हेही वाचाः राज्य आरोग्य विभागाकडून कोविड-19 नियमावलीत बदल

व्यक्तीमध्ये कोविडची लक्षणं आढळून आल्यास औषधोपचार

फक्त ताप असेल तरच पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम गोळी 6 तासांच्या अंतराने घ्यावी. रोज 4 पेक्षा जास्त वेळा घेऊ नये. डॉक्सीसायक्लिन 100 मिलीग्रॅम एक गोळी 5 दिवस नाश्ता आणि रात्रीच्या जेवणापूर्वी 1 तास अगोदर भांडंभर पाण्यासोबत बसून किंवा उभं राहून घ्यावी. घशाची जळजळ टाळण्यासाठी हे औषध घेतल्यानंतर लगेचच उजव्या कुशीवर आडवं झोपू नये. इव्हर्मेक्टिन 12 मिलीग्राम एक गोळी दररोज 5 दिवस दुपारच्या जेवणापूर्वी 1 तास अगोदर घ्यावी. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवणानंतर असं तीन वेळा बीटाडीन गुळण्या कराव्यात. बाटलीच्या कॅपच्या प्रमाणानुसार 5 मिली बीटाडीन 5 मिली साध्या पाण्यात मिसळून 10 मिली मिश्रण तयार करावं. 30 सेकंद खळखळून गुळण्या कराव्या. गुळण्या केल्यानंतर पुढील 30 मिनिटं म्हणजेच अर्धा तास काही खाऊ तसंच पिऊ नये. किंवा कोमट पाण्यात मीठ घालून त्याच्या दिवसातून 5 वेळा गुळण्या कराव्यात. एकावेळी किमान 5 मिनिटं वाफ घ्यावी. अशी वाफ दिवसातून 3 ते 5 वेळा घ्यावी. इनहेलरपासून एक फूट दूर रहावं. वाफेमुळे तोंड भाजणार नाही याची काळजी घ्यावी.

गरोदर बायका, स्तनपान करणाऱ्या महिला तसंच 15 वर्षांखालील मुलांनी इव्हर्मेक्टिन आणि डॉक्सीसायक्लिन गोळ्या घेऊ नयेत.

हेही वाचाः राज्याला ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी मिळाला होता निधी

हे सप्लिमेंट्सदेखील घेता येतात

झिंक (50 एमजी) सोबत विटामिन बिप्लेक्स रात्रीच्या जेवणासोबत दिवसातून एकदा घेता येते. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर दिवसातून दोनदा विटामिन सी (500 एमजी) गोळी घेता येते. दुपारच्या जेवणासोबत कॅल्शियमची गोळी (500एमजी) दिवसातून एकदा घेता येते. रात्रीच्या जेवणासोबत विटामीन डी गोळी 60 के आठवड्यातून एकदा, असे 8 आठवडे. प्रत्येक आठवड्यात त्याच दिवशी ही गोळी न चुकता घ्यावी. 15 वर्षांखालील मुलांसाठीः झिंकसोबत बिप्लेक्स सीरप, कॅल्शियम आणि विटामिन सी सप्लीमेंट औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेता येतात.

हेही वाचाः खरंच #Lockdown हा एकमेव पर्याय उरलाय का? ‘या’ आहेत ४ शक्यता

बलून एक्सरसाईज

तुमच्याने होते तेवढी फुग्यात हवा भरावी. तोंडाने फुग्यात हवा भरावी. फुग्यात भरलेली हवा पुन्हा तुमच्या तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. एका सेशनमध्ये 10 वेळा हा व्यायाम करावा. दर चार तासाने हे सेशन पुन्हा करावं. यामुळे तुमची फुफ्फुसं चांगली राहतील

हेही वाचाः Top 25 | महत्त्वाच्या २५ बातम्यांचा सुपरफास्ट आढावा #GoaNews #Marathi #Politics #Lockdown #Corona

पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चाचणी अहवालाची पर्वा न करता कृपया वरीलप्रमाणे औषधं सुरू ठेवावी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!