संस्कृती | धिरयो गोंयची परंपरा; कातांर तुफान गाजतंय

ख्रिस्तीबहुल भागात या धिरयोंची एक वेगळीच परंपरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : तामिळनाडू पोंगल उत्सवात जल्लीकुट्टची जशी परंपरा आहे, तशीच गोव्यातही पोर्तुगीजकाळापासून ख्रिस्ती आणि काही हिंदू उत्सवानिमित्त बैलांच्या झुंजीची परंपरा आहे. गोव्यात याला धिरयो असं संबोधलं जातं. विशेष करून ख्रिस्तीबहुल भागात या धिरयोंची एक वेगळीच परंपरा आहे. या धिरयोंवर पैजा लावल्या जातात आणि त्यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. राज्यातील अनेक गावांत खास धिरयोंसाठी बैल पाळले जातात. एखाद्या पहिलवानाची जशी बरकत आणि काळजी घेतली जाते तशीच धिरयोच्या बैलाची काळजी आणि देखरेख केली जाते. घरातला तो एक सदस्यच असतो.

धिरयोचा बैल घरात असणे हे प्रतिष्ठा आणि आपल्या आर्थिक उन्नतीचं प्रतिक म्हणूनही पाहिलं जातं. देशात 1960 साली प्राणी क्रुरता प्रतिबंध कायदा लागू झाला. प्राणीप्रेमींसाठी हा कायदा फायद्याचा ठरला आणि त्यांनी वेळोवेळी धिरयोंच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास सुरूवात केली. गोव्यातील धिरयो याला अपवाद नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने धिरयोवर बंदी लागू केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही धिरयोवर बंदी लागू केली. एवढे करूनही मटका जसा बिनधास्त चालतो त्या पद्धतीने धिरयोंचे आयोजन केले जाते.

धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी दुरूस्ती कायद्यात आणावी हा नेहमी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचा विषय असतो. पण प्रत्यक्षात मात्र काहीच होत नसल्याने घिरयो प्रेमी बरेच नाराज बनलेत. पेडणे तालुक्यात अलिकडेच धिरयोच्या निमित्ताने एका बैलाचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा धिरयो चर्चेत आले. ह्याच अनुषंगाने टेरेन्स दी आरंबोल याने धिरयो गोंयची परंपरा हे एक खास कातांर म्हणजेच गाणं तयार केलंय. या गाण्यात त्याने धिरयो परंपरेची माहिती आणि राज्यभरातील धिरयोंच्या बैलांचीही ओळख करून दिलीय. सध्या हे गीत युट्यूबवर बरंच गाजतंय.

पाहा व्हिडीओ :

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!