समुद्रकिनाऱ्याच्या भागात भाज्यांची लागवड वाढविण्यासाठी विशेष वेबिनार

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गोव्याच्या ICAR अर्थात केंद्रीय किनारपट्टी भागातील कृषी संशोधन संस्थेने VEGFASTTM या तंत्रज्ञानाने समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात भाज्यांची लागवड वाढविण्याच्या उद्देशाने एका वेबिनारचे आयोजन केले होते. पंजाबमधील जालंदरच्या ICAR-CPRS या संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ अभियंता सुखविंदर सिंग यांनी तो सादर केला. VEGFASTTM हे जालंदरच्या ICAR- CPRS अर्थात केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राने विकसित केलेले शहरी शेतीसाठीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. या आशादायक तंत्रज्ञानाच्या वापराला गोवा राज्यात खूप वाव आहे, तिथे इमारतींचे छत, गच्च्या, निवासी संस्थांचे छप्पर, उपहारगृहे, हॉटेल आणि समुद्रकिनारी आरोग्यपूर्ण तसेच ताज्या भाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करता येऊ शकेल. या वेबिनारला संबंधित 100 संस्थांचे अधिकारी झूम मंचाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
या वेबिनारचे प्रमुख पाहुणे गोवा सरकारचे कृषीविषयक सचिव कुलदीप सिंग गांगर यांनी गोवा राज्यातील भाजी उत्पादनातील कमतरता दूर करण्याची तातडीची गरज ओळखून गोव्याच्या ICAR-CCARI या संस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. गोवा राज्यातील भाजी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ICAR-CCARI या संस्था आणि गोव्याचे कृषी संचालनालय यांनी सहकारी तत्वावर आणखी काम करण्यावर भर दिला.
गोव्यातील ICAR-CCARI चे संचालक डॉ.प्रवीणकुमार यांनी गोवा राज्याला भाजीपाला उत्पादनात अधिक स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि भाजीपाल्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांवरील गोव्याचे अवलंबित्व कमी करण्यासाठी VEGFASTTM सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. ICAR-सिमल्याच्या CPRS चे माजी संचालक डॉ. एस.के.पांडे यांनी त्यांच्या भाषणात गोव्याच्या ICAR-CPRS या संस्थांनी सहकार्यातून प्रायोगिक तत्वावर VEGFASTTM सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात करावी, अशी सूचना केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिवशरणाप्पा आणि भाजीपाला विषयक विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. चौधरी गणेश वासुदेव यांनी संयोजन केले.