बिगर गोमंतकीयांसाठी सरकारकडून खास लसीकरण मोहीम

आसगाव पंचायत सभागृहात देण्यात आला कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी हळुहळू कमी होत असला, तरी लवकरात लवकर 100 टक्के लसीकरण करणं आवश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्या अगोदर राज्यातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मिळायला हवी, असा पवित्रा सरकारने स्वीकारलाय. राज्यात बिगर गोमंतकीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गोंयकारांच्या लसीकरणासोबतच या समुदायाच्या लसीकरणासाठी सरकारने खास मोहीम सुरू केलीये.

आसगांव पंचायत सभागृहात लसीकरण मोहीम

राज्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांंच्या लसीकरणाला महत्व देताना सरकारने या समुदायासाठी खास लसीकरण मोहीम सुरू केलीये. या मोहिमेंतर्गत आसगांव येथे पंचायत सभागृहात उत्तर गोव्यातील बेघर तसंच विदेशी नागरिकांना करोनाची लस टोचण्यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी या समुदायाने लसीकरण केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

पणजी डॉन बॉस्को विद्यालयातही पार पडलं लसीकरण

या लसीकरण मोहिमेंतर्गत उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यासाठी आसगांव तसंच तिसवाडी तालुक्यासाठी पणजीतील डॉन बॉस्को विद्यालय लसीकरण मोहीम राबण्यात आली. आसगांव तसंच पणजी अशा दोन केंद्रांवर शनिवारी लसीकरण करण्यात आलं.

जुलै 30 पर्यंत राज्यातील प्रत्येकाला कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट सरकारने समोर ठेवलंय. त्या अनुषंगाने राज्यातील लसीकरण मोहिमेला वेग आलेला दिसतोय. याचाच एक भाग म्हणून बिगर गोमंतकीयांच्या लसीकरणासाठी सरकाने ही खास लसीकरण मोहीम राबवली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!