बिबट्याच्या बंदोबस्तासाठी खास पथक तैनात

स्थानिकांच्या तक्रारीची वनाधिकाऱ्यांकडून दखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः होंडा येथे बिबट्याची दहशत पसरल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. ‘गोवन वार्ता लाईव्ह’ने याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर वाळपईच्या वनाधिकाऱ्यांनी सदर बिबट्याच्या बंदोबस्तासाठी खास पथक तैनात केलं आहे. सध्यातरी त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येणार असून पूर्ण स्वरूपाचं नियोजन करून त्याला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती वाळपईचे वनाधिकारी दीपक तांडेल यांनी दिली.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये ‘सजग’ गस्ती जहाज सामील

चिरेव्हाळ गावात बिबट्याची दहशत

होंडा-सत्तरीतील चिरेव्हाळ गावात गेल्या जवळपास एक महिन्यापासून एक बिबटा लोकवस्तीत घुसून नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहे. त्याचप्रमाणे एका महिन्यापूर्वी त्यांने अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला. चार दिवसांपूर्वी हा बिबट्या गावातील मराठे कुटुंबीयांच्या घरामध्ये घुसला. त्यामुळे नागरिकांमध्ये अजून भीतीचं वातावरण पसरलं. म्हणून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी वन खात्याच्या कार्यालयाकडे केली होती. त्याची दखल घेऊन वनाधिकारी दीपक तांडेल यांनी वनखात्याचे सहाय्यक अधिकारी महादेव गावकर यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तैनात केलं आहे.

हेही वाचाः बेळगावात कडक लॉकडाऊन जाहीर; 7 जूनपर्यंत बाजारपेठा बंद

खास पथक तैनात

हा बिबटा गावात  घुसून नागरिकांमध्ये ज्या पद्धतीने भीती निर्माण करतोय, त्यानुसार त्याला जेरबंद करण्यात येईल. अन्यथा या भागातून त्याला हाकलून लावण्यासाठी वनखात्याची यंत्रणा प्रयत्न करणार आहे. सध्यातरी त्याच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. नियोजन करून त्याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून वनखात्याची यंत्रणा काम करणार असल्याचं दीपक तांडेल यांनी सांगितलं.

पहा व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!