SPECIAL | करोनाला नेस्तनाबूत करणं हे एकच ध्येय : मुख्यमंत्री

करोनाचे नियम पाळून जनतेने सरकारला सहकार्य करावं

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: राज्यात वेगाने प्रसरणाऱ्या करोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करतायत. करोनाला नेस्तनाबूत करण्याचं ध्येय ठेवूनच आम्ही मैदानात उतरलोत. यात आम्हाला लवकरात लवकर यश मिळेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘गोवन वार्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

हेही वाचाः वेळीच रुग्णालयात दाखल व्हा, वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही – मुख्यमंत्री

करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात धुमाकूळ घातलाय. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची तयारी कशापद्धतीनं सुरू आहे?

उत्तर: करोना प्रसार देशभर वाढतोय. त्याचप्रमाणे गोव्यातही वाढत आहे. वाढत्या संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात शंभर टक्के सुविधा उपलब्ध केल्यात. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा करण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या आणि जागृतीवर भर देण्यात येतेय. महामारीच्या काळात जनतेने स्वत:ची जबाबदारी ओळखून वागणं गरजेचं असतं. पण सध्या अनेकजण करोना नियमांकडे दुर्लक्ष करून करोना प्रसार वाढवत आहेत आणि संपूर्ण जबाबदारी सरकारवर ढकलतायत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येकाने करोना नियम पाळून सरकारला सहकार्य करणं आणि पात्रतेनुसार तत्काळ लसीकरण करून घेणं गरजेचं आहे.

हेही वाचाः सोमवारी रुग्णवाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री तात्काळ दिल्लीला रवाना झाले, ते ‘या’ कारणासाठी

करोना प्रसार रोखण्यासाठी सरकारने बुधवारी जारी केलेले निर्बंध पुरेसे ठरतील का? की राज्याला लॉकडाऊनची गरज आहे?

उत्तर: महामारीच्या काळात प्रत्यक्ष मैदानात असलेली आपत्कालीन पथक, साथीचे रोग तज्ज्ञ यांचे सल्ले घेऊन तसंच राज्यातील उद्योग, व्यावसायिक व सर्वसामान्य जनतेचा विचार करूनच सरकारने निर्बंध जारी केलेत. करोना नियंत्रण आणि राज्यातील आर्थिक उपक्रम या दोन्ही गोष्टी एकाचवेळी साध्य करण्याचा विचार करूनच निर्बंध लागू केलेत. यातून करोनावर निश्चित नियंत्रण मिळवता येईल. गोव्याला लॉकडाऊनची गरजच भासणार नाही

हेही वाचाः नम्र विनंती, यंदा कसलेच सोहळे नकोत!

इतर बऱ्याच राज्यांनी परप्रांतातून येणारे प्रवासी, पर्यटकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. पण गोवा सरकारने अद्याप असा निर्णय का घेतलेला नाही?

उत्तर: राज्यात करोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर इतर राज्यांतून गोव्यात येणारे ७० टक्के पर्यटक आपापल्या राज्यांतच थांबलेत. आता जे ३० टक्के लोक येत आहेत, त्यातील अनेकजण व्यवसायानिमित्त येत आहेत. त्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती केल्यास तेही गोव्याकडे पाठ फिरवतील. त्याचा मोठा फटका पर्यटन तसंच इतर उद्योगांना बसेल. त्यातून पुन्हा राज्याची आर्थिक उलाढाल थांबून अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळेच सरकारने त्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती केलेली नाही.

हेही वाचाः ALPHANSO | ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा

करोनाच्या दुसऱ्या लाटेला तरुणाई अधिक बळी पडत आहे. बाधितांतही तरुणांची संख्या वाढत आहे. यावर काय उपाय?

उत्तर: या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणाईने स्वत:सह समाजाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. राज्यातील शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी, तरुणांनी विनाकारण रस्त्यांवर फिरू नये. क्रीडा स्पर्धा तसेच पार्ट्या पूर्णपणे बंद कराव्या. गर्दीच्या ठिकाणी जाऊन करोनाला स्वत:च्या घरी आणू नये, इतका सल्ला मी तरुणांना देऊ इच्छितो.

हेही वाचाः CORONA VACCINATION | मी घेतली, तुम्ही कधी घेताय?

लसीकरणामुळे करोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल का?

उत्तर: निश्चित. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील ६० आणि ४५ वर्षांवरील दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी लसींचे एक-दोन डोस घेतलेत. ज्या कुटुंबातील लोकांनी डोस घेतलेत त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. पण पात्र असूनही ज्यांनी डोस घेतलेले नाहीत, त्यापैकी अनेकांना करोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींनी तत्काळ लसीकरण करून घेणं गरजेचं आहे.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील टॉप 10 मुद्दे

करोनाच्या वाढत्या प्रसाराचा ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेला फटका बसेल का? मोहीम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत?

उत्तर: आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहिमेचा जन्मच मुळात करोना महामारीत झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत ही संकल्पना जवळपास ६० टक्के जनतेत रूजली आहे. मुख्यमंत्री कार्यालय तसंच नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे अधिकारी दिवसरात्र अथक परिश्रम करून योजना पुढे नेतायत. गेल्या ६० वर्षांत मूळ गोंयकारांना ज्या सोयीसुविधा, योजना मिळाल्या नाहीत, त्या आता या मोहिमेमुळे मिळत आहेत. करोनाचा प्रसार लक्षात घेऊन या योजनेत खंड पडू नये, यासाठीची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी नुकतेच राज्यभरात १,६०० स्वयंपूर्ण सहाय्यकांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक भाजप तुमच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा तुमच्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे का?

उत्तर: सद्यःस्थितीत माझ्यासाठी निवडणुकांपेक्षा कोविड नियोजन महत्त्वाचं आहे. करोना संकटाचा सामना करीत साधनसुविधा उभारणं आणि कुशल मनुष्यबळ तयार करणं, हेच माझं ध्येय आहे. भाजप पक्षसंघटनेकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. माझ्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या मागील काही निवडणुकांत पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळेल, यात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!