लिफ्ट बंद पडली अन् काळजाचा ठोकाच चुकला..!

लिफ्टचा दरवाजा फोडून सात जणांना जीवदान, दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमधील प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हॉस्पिटलची लिफ्ट बंद पडल्यानं आत सात रुग्ण अडकले. लिफ्टचा दरवाजा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.

समोर साक्षात मृत्यू दिसत होता…

शनिवार 1 मे. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमधील लिफ्टमध्ये सात रुग्ण लिफ्टमधून जात होते. अचानक लिफ्ट बंद पडली. सातही रुग्णांचा जीव कासाविस झाला. त्यांनी मदतीसाठी याचना केली. मात्र लिफ्ट बंद असल्यामुळे बाहेरून काहीच करता येईना. अशा स्थितीत अग्निशामक दल आणि पोलिसांनी एक निर्णय घेतला. लिफ्टचा दरवाजा फोडण्याचा. हातोड्याचे घाव घालून दरवाजा फोडायला सुरुवात झाली. आत अडकलेल्या रुग्णांना समोर साक्षात मृत्यू दिसत होता. अशा स्थितीत अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. लिफ्टचा मजबूत दरवाजा फोड÷ण्यासाठी त्यांनी सामूहिक प्रयत्नांची शर्थ केली. अखेरीस दरवाजाचा एक भाग फोडण्यात यश आलं. त्यातून आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.

जबाबदारी कोण स्वीकारणार?

सात जणांचा जीव वाचला खरा, परंतु या घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले. सध्याच्या कोविड लढ्याच्या काळात लिफ्टसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेची व्यवस्था पाहण्यासाठी कोणाची नियुक्ती का केली नाही? दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमधील या घटनेची जबाबदारी कोण स्वीकारणार? आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी संघर्ष करणार्‍या राज्य सरकारचा हा हलगर्जीपणा नव्हे काय? इतकी गंभीर घटना घडून गेल्यानंतर सरकारनं इतर रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केल्यात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण यात तब्बल सात जणांचा जीव धोक्यात आला होता. अशा स्थितीत सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून अशा प्रसंगांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!