लुटारू नेत्यांनी मला राजकारण शिकवू नये…

सोपटेंचा सरदेसाईंवर हल्लाबोल, कळंगुटकरांना महत्त्वच देत नसल्याची प्रतिक्रिया

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः आपल्याला व्हायरस संबोधित करणारे गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई (Vijai Sardesai) खरं तर गोव्याचे लुटारू आहेत. तसंच 5 रुपयेही खर्च न करता दोन वेळा जिल्हा पंचातीवर निवडून आणलेल्या दीपक कळंगुटकरांना महत्त्व देण्यात अजिबात रस नाहीए, अशी टोलेबाजी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केलीय. या नेत्यांनी मला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असा इशाराही त्यांनी दिलाय.

सरदेसाईंची अवस्था मासळीसारखी

आपल्याला व्हायरस म्हणणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाला दसऱ्याच्या दिवशीच खऱ्या अर्थानं व्हायरसची लागण झालीय. विजय सरदेसाई नगर नियोजन खात्याचे मंत्री असताना त्यांनी गोव्याला लुटलं. आता सत्तेबाहेर फेकले गेल्यानं ते मासळीसारखे तडफडत आहेत, अशा शब्दांत त्यांनी फातोर्ड्याच्या आमदारांवर टीका केली.

कळंगुटकर तेव्हा कुठं होते?

दीपक कळंगुटकर यांच्या प्रवेशाने मांद्रेत भाजपला धक्का बसल्याचा दावा त्यांनी खोडून काढला. २०१९ पोटनिवडणुकीत आपण भाजपचा उमेदवार होतो. त्यावेळी स्वतःला भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणवणारे दीपक कळंगुटकर कुठे होते, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हान सोपटेंनी दिलं. अशा माणसांवर बोलून त्यांना महत्त्व देण्यात अजिबात रस नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

गेली 22 वर्षं राजकारणात आहे. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. दोन वेळा निवडून येऊन मला राजकारण शिकवण्याची गरज नाही
दयानंद सोपटे, आमदार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!