हणजूण सुरा हल्ला, संशयिताला अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा: काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते की लवकरात लवकर राज्यातील गुन्हेगारांना तडीपार करणार. गोव्यातील गुन्हेगारीचा समूळ नाश करणार. मात्र इथे दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. बलात्कार, चोऱ्या, खून, हल्ले इ. प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. हणजूण इथे असाच एक प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
हेही वाचाः गोवा खंडपीठाचे कामकाज १७ ऑगस्ट पासून नव्या इमारतीत सुरू
काय झालं?
हणजूण येथे पूर्ववैमनस्यातून नामदेव वालावलकर यांच्यावर सुरा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी फरारी संशयित ओबेरॉय डिक्रूझ याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी मन्की बार अँड रेस्टॉरंटजवळ घडला.
काय आहे प्रकरण?
संशयित आरोपी डिक्रुज (इगर्जवाडा) आणि फिर्यादी वालावलकर (मझलवाडा) हे दोघेही मोटारसायकल वरून अंतर्गत रस्त्याने जात होते. घटनास्थळी दोघेही एकमेकांसमोर आले. तिथे त्यांचा वाद झाला आणि संशयिताने फिर्यादीवर सुरा हल्ला केला.
हेही वाचाः डिचोलीत घर फोडून एक लाखांची चोरी
घटनेनंतर पसार झालेल्या संशयित आरोपीला मंगळवारी संध्याकाळी उशीरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास उपनिरीक्षक स्नेहा सावळ करीत आहेत.