समुद्र किनाऱ्यांवरुन गोव्याची खरी संस्कृती लोकाभिमुख : स्वामी ब्रह्मेशानंद

Goan Varta Live | प्रतिनिधी
कुंडई : स्वतःच्या जीवनाचा उद्धार हा स्वतःच्याच हाती असतो. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांच्या माध्यमातून गोव्याची खरी ओळख संपूर्ण विश्वस्तरावर ज्ञात होणे आवश्यक आहे. सोमवती (मौनी) अमावस्यासारखे अध्यात्मिक, सामाजिक, धार्मिकदृष्ट्या समुद्र किनाऱ्यांच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविणारे उपक्रम गोमंतक राज्य असो अथवा आंतराष्ट्रीय पातळीवर असो या उपक्रमांचा प्रवाह निरंतर चालूच राहणारा आहे. ही गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांची परिवर्तनाकडे ऐतिहासिक वाटचाल आहे, असे उद्बोधन ब्रह्मेशानंद स्वामींनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाद्वारे गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सोमवती अमावस्या महास्नानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्बोधन करत होते.
स्वामी म्हणाले की, गोव्यात मानवी जीवनात श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करणारी विविध श्रद्धास्थाने तथा प्राचीन मंदीरे आहेत. ईश्वरावर प्राणापलीकडे प्रेम करून आमच्या पूर्वजांनी ती जपून ठेवली आहेत. गोमंत प्रदेश सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. समुद्र किनारे ही तर संपूर्ण विश्वात गोव्याची ओळख आहे. अशा समुद्र किनाऱ्यांवरुन गोव्याची खरी संस्कृती लोकाभिमुख होईल. व आपला गोव्याची दिव्य संस्कृती विश्वभर पोहोचविण्यासाठी एकनिष्ठेने गोव्यातील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. समुद्र किनारे हिच गोभूमीची खरी ताकद आहेत. यांच्या प्रति नितांत श्रद्धा असणे हेच एकतेचे मूळ आहे. गोव्यात पूर्वापार सोमवतीची परंपरा आहे.
हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणत्याही पवित्र नदीवर, समुद्र किनाऱ्यावर स्नान करुन सूर्यार्घ्यदान विधी संपन्न होतो. सोमवती अमावस्यानिमित्त समुद्र किनारी सद्गुरु महापूजा संपन्न करुन सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक वृद्धीसाठी तपोभूमी वैदिक गुरुकुल ब्रह्मवृंदांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
सोमवती अमावस्याप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेले अनुष्ठान वेदमूर्ती साईदत्तजी, वेदमूर्ती दीपकजी, वेदमूर्ती साईशजी, वेदमूर्ती विष्णूजी, वेदमूर्ती जनार्दनजी व वेदमूर्ती सुभानजी यांच्या पौरोहित्याखाली संपन्न झाले.