महिलांविषयी समाजाचा दृष्टीकोन बदलेला नाही – दिगंबर कामत

फोंडा फर्स्ट संस्थेतर्फे महिला दिन; विविध क्षेत्रातील १०० महिलांचा गौरव

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः आज विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. पण त्यांच्याशी वागण्या-बोलण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला दिसत नसल्याचं विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटलंय. फोंडा फर्स्ट संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. ८ मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फोंडा फर्स्ट संस्थेतर्फे रविवारी महिला दिन विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. येथील राजीव कला मंदिरात हा विशेष कार्यक्रम रंगला.

माननीय पाहुण्यांची उपस्थिती…

या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, डॉ. प्रमोद साळगावकर, पूनम शिरसाट, अ‍ॅडव्होकेट दीप्ती पारोडकर, पंच शैलेश शेट तसंच फोंडा फर्स्ट संस्थेचे अध्यक्ष राजेश वेरेकर उपस्थित होते.

‘स्त्री सन्मान पुरस्कार २०२१’चं वितरण…

या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरला ‘स्त्री सन्मान पुरस्कार २०२१.’ समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १०० महिलांना ‘स्त्री सन्मान पुरस्कार २०२१’ पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामाजिक क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र तसंच धैर्य दाखवलेल्या, आयुष्यातील बिकट परिस्थितीवर मात करत स्वतःची वेगळी वाट धुंडाळलेल्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं.

महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ…

आपल्या देशात महिला ज्या प्रश्नांनी पीडित आहे, त्याच प्रश्नांनी जगभरातील इतर महिलाही त्रस्त आहेत, मग ते महिलांवर होणारे अत्याचार असोत किंवा कौटुंब हिंसा. थोडक्यात आपल्या देशाची आणि जगाची परिस्थिती महिलांच्या बाबतीत वेगळी नाही. महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या आकडेवारीत घट व्हायची सोडून ती वाढतच आहे, जे खूप दुर्दैवी आहे, अशी खंत डॉ. प्रमोद साळगावकरांनी व्यक्त केली.

महिला सक्षम आहेत…

२०१८ मध्ये मी यूएनमध्ये देशाची प्रतिनिधी म्हणून ‘लिंग समानता’ या विषयावर बोलण्यासाठी गेले होते. तिथे बऱ्याच देशातून महिला, तरुणी आल्या होत्या. सगळ्या महिलांनी आपापल्या देशातील महिलांशी संबंधित समस्या मांडल्या. तेव्हा मला असं जाणवलं की महिलांच्या समस्या फक्त आपल्याच देशात नाहीत, तर जगाच्या कानाकोपऱ्यात असलेली महिला कुठल्या ना कुठल्या अत्याचाराची शिकार आहे. आपल्याला असं वाटतं की अमेरीका खूप पुढारलेला देश आहे. पण अमेरीकेतही महिलांवर बलात्कार, खून, छळ असे सगळे प्रकार होत असतात. महिला सक्षमीकरणासाठी आपण जगाशी भांडायची गरज नाही, तर परमेश्वराने आपल्याला अगोदरच सक्षम बनवलंय, फक्त ही गोष्ट आपण ओळखण्याची गरज आहे, असं पूनम शिरसाट म्हणाल्या.

फोंडा फर्स्ट ही संस्था शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र तसंच महिला सबलीकरणासाठी कार्यरत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!