दक्षिण गोवा जिल्हा कोविड हॉस्पिटलात आतापर्यंत 200 बाधित गर्भवतींवर उपचार

आत्तापर्यंत एकूण 80 गर्भवतींची सुखरूप प्रसूती; अजूनही 26 रुग्ण दाखल

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलातील विशेष विभागात आतापर्यंत 200 कोविडबाधित गर्भवती महिलांवर उपचार करण्यात आले असून, यातील 80 महिलांची सुखरूप प्रसुतीही करण्यात आली आहे. या 80 पैकी 65 महिलांची सिझेरियन पद्धतीने, तर 15 महिलांची नैसर्गिक पद्धतीने प्रसुती झाली आहे. सध्या येथे 26 गर्भवती महिला उपचार घेत आहेत. या महिला रुग्णांची सर्व प्रकारची काळजी हॉस्पिटलातील वैद्यकीय अधिकारी घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. राजेश पाटील यांनी दिली.

हेही वाचाः शेतकरी देशाचा कणा

कोरोनाबाधितांमध्ये 200 गर्भवती महिलांचा समावेश

राज्यात गतवर्षी जूनमध्ये कोविडची पहिली लाट फैलावली होती. तेव्हा दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचं काम अंतिम टप्प्यात होतं. त्यावेळेस ईएसआय आणि हॉस्पिसिओ हॉस्पिटल्सचं रुपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं होतं. सप्टेंबर 2020 च्या आधी याच दोन्ही हॉस्पिटल्सवर ताण होता. ईएसआय हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी फातोर्ड्यातील नव्या इमारतीत उपचार सुरू करण्याचा दबाव वाढत चालला होता. अखेर बांधकाम पूर्ण होताच 19 सप्टेंबर 2020 रोजी येथे थेट कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आलं. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात आतापर्यंत 13,025 बाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. आपत्कालिन विभागात दाखल बाधितांची संख्या 12,573 एवढी आहे. येथे उपचार घेणाऱ्या बाधितांमध्ये 200 गर्भवती महिलांचा समावेश आहे.

हेही वाचाः शेती हा शेतकऱ्यांचा श्वास

जिल्हा हॉस्पिटलात 568 खाटा

जिल्हा हॉस्पिटलात सुरुवातीला केवळ दीडशे खाटा होत्या. कोविडच्या दुसऱ्या लाटेत हॉस्पिटलातील खाटांची संख्या वाढवून 350 आणि त्यानंतर 568 एवढी करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली. काही रुग्णांना त्याही खाटा मिळत नसल्यास गादी टाकून त्यावर उपचार सुरू करून डॉक्टरांनी अनेकांचे प्राण वाचवले.

हेही वाचाः हवामानातील समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं गरजेचं: श्याम साखळकर

ऑक्सिजन प्रकल्प, कार्डियाक विभागाची प्रतीक्षा

राज्यात ऑक्सिजनची समस्या उद्भवताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलला भेट दिली होती. तेव्हा 15 मेपर्यंत कॉम्प्रेसर आल्यावर ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येईल, असं सांगितलं होतं. मात्र, अजूनही ती प्रक्रिया सुरूच आहे. जिल्हा हॉस्पिटलात आतापर्यंत ऑक्सिजनची समस्या आलेली नसली, तरी या प्रकल्पाकडे प्रामुख्याने लक्ष देणं आवश्यक आहे. तसंच अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी कार्डियाक सुविधा जिल्हा हॉस्पिटलात सुरू करण्याची घोषणा केली होती. तीही अजूनही पूर्ण झालेली नाही. सध्या इतर वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेत कार्डियाकची समस्या असलेल्या रुग्णांना चांगली सेवा देण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचाः होंडा औद्योगिक वसाहतीमधील खराब गटार अवस्थेचा वाहनचालकांना त्रास

हॉस्पिटलची स्थिती (19 सप्टेंबर 2020 ते 5 जून 2021)

एकूण रुग्णसंख्या : 13,025
आपत्कालिन विभागातील रुग्ण : 12,573
गृह विलगीकरणातील रुग्ण : 452
उपचारासाठी दाखल : 4,788
डिस्चार्ज दिलेले रुग्ण : 3,490
गोमेकॉला पाठवलेले रुग्ण : 378
कोविड निगा केंद्रात पाठवलेले रुग्ण : 209
मृत्यू : 526
सध्या उपचार घेणारे रुग्ण : 176

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच

पावसाळ्यात ताप आल्यास तपासणी करा!

कोविडची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मृत्यूदर घटल्याने नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. मास्क लावणं, सामाजिक अंतर राखणं यांसह लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. मात्र, त्यासाठी तयार राहून काळजी घेणं आवश्यक आहे. मान्सून आल्यानंतर सर्दी, ताप, खोकला यांचं प्रमाण वाढतं. अशी लक्षणं आल्यास घरी उपचार घेणं टाळून कोविडची चाचणी करून घेणं आवश्यक आहे, असं आवाहन डॉ. राजेश पाटील यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!