आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या ११ जणांचा कोविडमुळे मृत्यू!

सर्वच मृतांना कोविडसोबत इतर गंभीर आजार; दोन कॅन्सरग्रस्तांचाही समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोविड संसर्ग होऊन मृत पावलेल्या ११ जणांची नोंद राज्यात झाली आहे. या अकराही जणांना कोविडसोबतच इतर गंभीर आजार होते, अशी माहिती साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी गुरुवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

हेही वाचाः अदानींनंतर आता अंबानींचा धमाका; ‘ही’ कंपनी रिलायन्सच्या ताब्यात

दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोविड होऊन मृत पावलेल्या अकरापैकी तिघांना उच्च रक्तदाब, दुसऱ्या तिघांना मधुमेह, दोघांना कॅन्सर, इतर दोघांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब, तर एकाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनीचा आजार होता. गंभीर आजार असतानाच त्यात कोविडची भर पडल्याने दोन्ही डोस घेऊनही या रुग्णांचा मृत्यू झाला. २७ जून २०२१ रोजी अशा प्रकारच्या अकराव्या रुग्णाचा मृत्यू झाला होता, असंही डॉ. बेतोडकर यांनी सांगितलं.

कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. त्यामुळे गोव्यासह देशातील सर्वच राज्यांनी लसीकरणावर भर दिला आहे. कोविड लसीचे दोन्ही डास घेतल्यानंतर कोविडविरोधात लढण्यासाठीच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. त्यामुळे कोविडची पुन्हा लागण होण्याचा धोका कमी होतो, असं वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पण, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदींसारख्या राज्यांमध्ये दोन्ही डोस घेऊनही मृत पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. लसीकरण सुरू केल्यापासून दोन्ही डोस घेऊनही कोविड बाधित होऊन राज्यातील केवळ ११ जणांनाच मृत्यू झालेला असून, सर्वच मृतांना कोविडसोबतच इतर गंभीर आजार होते. शिवाय गेल्या दोन महिन्यांत असं एकही प्रकरण घडलेलं नसल्याचं डॉ. बेतोडकर यांनी स्पष्ट केल्यानं गोंयकारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादीची युतीबाबत काँग्रेसला डेडलाईन!

सक्रिय बाधितांत पुन्हा होतेय वाढ!

– बुधवार आणि गुरुवारच्या चोवीस तासांत राज्यात एकाही कोविड बळीची नोंद झाली नाही. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ३,२०२ वर कायम राहिला. या चोवीस तासांत नवे ९६ रुग्ण आढळून आले. ७२ जण कोविडमुक्त झाले. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ९१३ झाली आहे.
– राज्यातील एकूण कोविडमुक्तांनी गुरुवारी १.७० लाखांचा आकडा पार केला. सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यात १,७४,१४६ जणांना कोविडची लागण झाली. त्यातील १,७०,०३१ जणांनी कोविडवर यशस्वीरीत्या मात केली आहे.
– काही दिवसांपूर्वी राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या कमी झाली होती. मडगाव वगळता इतर केंद्रांत ५० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण होते. पण, सध्या बहुतांशी केंद्रांत सक्रिय बाधितांत पुन्हा वाढ होत आहे.
– गुरुवारी पणजीत सर्वाधिक ७३ सक्रिय रुग्ण होते. मडगावात ५८, काणकोणात ५५, शिवोलीत ४९, पर्वरी व कांसावलीत प्रत्येकी ४२, कुडतरीत ३७, कुठ्ठाळीत ३५, चिंचणीत ३४, म्हापसा व चिंबलमध्ये प्रत्येकी ३३, नावेलीत ३२, कांदोळी आणि खोर्लीत प्रत्येकी ३० सक्रिय रुग्ण होते. इतर केंद्रांत ३० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

हा व्हिडिओ पहाः Siddhi Death Case | Murder or Sucide | सिद्धी नाईक संशयित मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!