आतापर्यंत १०८ जोडप्यांना ‘मातृत्व’चा लाभ !

एसटी समाजासाठी योजना; अपत्यप्राप्तीसाठी मिळते ५ लाखांपर्यंतचे साहाय्य

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: अनुसूचित जमातीतील (एसटी) सुमारे १०८ जोडप्यांनी आतापर्यंत राज्य सरकारच्या मातृत्व योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातील काहींना योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर अपत्यप्राप्ती झाली आहे. एसटी समाजातील अधिकाधिक जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आदिवासी कल्याण खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

८ फेब्रुवारी २०१८ रोजी मातृत्व योजना अधिसूचित

लग्नानंतर अनेक जोडप्यांना बराचकाळ अपत्यप्राप्ती होत नाही. त्याचे अनेक परिणाम अशा जोडप्यांच्या जीवनावर होत असतात. शिवाय त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरणही होत असते. एसटी समाजातील काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असते. त्यामुळे, त्यांना अपत्यप्राप्तीसाठी दर्जेदार उपचार घेणे शक्य होत नाही. अशा जोडप्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने दि. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी मातृत्व योजना अधिसूचित केली आणि योजनेअंतर्गत जोडप्यांना वैद्यकीय उपचारांसाठी अर्थसाहाय्य करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत अशा सुमारे १०८ जोडप्यांनी योजनेचा लाभ घेऊन वैद्यकीय उपचार घेतले असून, त्यातील अनेकांना अपत्यप्राप्ती झाली आहे. यात आपल्या प्रियोळ मतदारसंघातील तीन जोडप्यांचा समावेश आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

योजनेअंतर्गत सुरुवातीला उपचार घेतलेल्या काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती

कोविड प्रसारामुळे गेल्या दीड वर्षांत योजनेची गती मंदावली आहे. पण, भविष्यात अधिकाधिक जोडपी या योजनेचा लाभ घेतील. योजनेअंतर्गत सुरुवातीला उपचार घेतलेल्या काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. इतरांनाही वैद्यकीय उपचारांचा निश्चित फायदा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

काय आहे योजना?

* एसटी समाजातील ज्या जोडप्यांना तीन वर्षांपर्यंत मूल होत नाही, अशांना वैद्यकीय उपचारांसाठी पाच लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. 

* संबंधित जोडप्याला कृत्रिम गर्भधारणा (आयव्हीए) किंवा कृत्रिम बीजारोपण (आययूआय) उपचार पद्धती उपलब्ध असलेल्या, राज्यातील सरकारी तसेच खासगी इस्पितळांत उपचार घ्यावे लागतात.

* पहिल्या अपत्यप्राप्तीसाठी योजनेचा लाभ घेता येतो.

* उपचारांनंतर अपत्यप्राप्ती झाल्यास गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळामार्फत संबंधित जोडप्याने ज्या इस्पितळात उपचार घेतले त्या इस्पितळास खर्च देण्यात देतो.

योजनेसाठी पात्रता व अटी

* केवळ एसटी समाजातील जोडप्यांनाच लाभ

* उत्पन्न मर्‍यादेची अट नाही

* विवाह प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्म दाखले व वैद्यकीय उपचार घेतलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!