पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे!

दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं!

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे… असं काहीसं चित्र आहे पेडणे तालुक्याचं… शुक्रवारी पुराच्या रुपात गंगामाई आली, अन् अनेकांच्या घरट्यांमध्ये माहेरवाशिणीसारखी नाचून गेली. मात्र जाताना रिकाम्या हाती गेली नाही, तर सोबत बरंच काही घेऊन गेली… शुक्रवारी या भागात आलेल्या पुरानं येथील असंख्य लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. काहीच्या उत्पन्नाचं स्त्रोत नाहीसं केलंय, तर काहींच्या डोक्यावरचं छप्परच काढून घेतलंय. शनिवारी पुराचं पाणी या भागात हळूहळू ओसरायला सुरुवात झालीए. गोवन वार्ता लाईव्हचे पेडणे प्रतिनिधी मकबूल माळगीमनी यांनी आपल्या रिपोर्टिंगचा अनुभव मांडला आहे.

‘या पुराने आमच्या नाका-तोंडात गाळ भरलाय असं वाटू लागलंय…’ डोळ्यात पाणी आणून पुराचा फटका बसलेले लोक सांगत होते. शुक्रवारी पूर येऊन गेल्यानंतर शनिवारी पाणी पूर्ण ओसरलंय… अन् मोडलेलं घरटं तात्पुरतं उभारण्यासाठी लोक उभे राहिलेत. पेडणे तालुक्यातील इब्रामपूर, चांदेल, हसापूर, कासारवर्णे, हणखणे, हळर्ण, तळर्ण, तोरसे या भागांसाठी ही परिस्थिती नवीन नाही… गेली 3 वर्षं कमी जास्त प्रमाणात येथील लोक हेच अनुभवताहेत. गेल्यावर्षी या भागातील लोकांचं तब्बल 12 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. यंदा किती नुकसान झालंय, त्याचा निश्चित आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

इब्रामपूर, चांदेल, हसापूर, कासारवर्णे, हणखणे, हळर्ण, तळर्ण, तोरसे खुटवळ तसंच इतर गावांमध्ये मिळून जवळपास पन्नास एक लोकांच्या घरात पुराचं पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर चिखल-गाळ जमा झालाय. अनेकांची घरं मोडून पडलीत, तर काही घरांच्या भिंती पाणी गेल्यामुळे मऊ होऊन त्यांना तडे गेलेत. ही घरं कोणत्याही क्षणी मोडून पडू शकतील अशा अवस्थेत पोहोचलीये. थकलेल्या शरिराला दोन घटका विश्रांती देणार तर झोपण्याचीही भीती. त्यामुळे आमचं एखाद्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, असं या भागातील लोक कळवळून सांगत आहेत.

शेती-बागायतींच्या झालेल्या नुकसानीविषयी या भागातील लोकांकडून बोलवत नव्हतं. एका कुटुंबाची सुमारे 700 केळींचं झाडं वाहून गेली. पिक तयार झालेलं. मात्र निसर्गाने हाता तोंडाशी आलेला घास काढून घेतला. हसापूर भागात लोकांच्या शेतजमिनीत पाणी भरून भाज्या, भात अशी केलेली लागवड मातीमोल झाली. शिवाय नव्याने लावलेले कवाथेही वाहून गेलेत.

मंत्री, आमदार भेटी देऊन गेले.. पण दुरुनच. आमच्या घरांची स्थिती कुणीही पाहिली नाही. सकाळी तलाठी आले, धावती भेट देऊन गेले… कोणकोणत्या सामानाची नुकसानं झाली हे विचारलं.. गुरुवारच्या रात्री पाणी भरायला सुरुवात झाली तेव्हा मात्र सरकारी यंत्रणा आली नाही. आमच्यासारख्या गरिबांपर्यंत, ज्यांना खरी मदतीची गरज आहे, त्यांना कुणीच वाली नाही का? असा प्रश्न विचारून लोक रडू लागले.

दरवर्षी ही पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान होतं. आम्ही स्थलांतर करायला तयार आहोत. मात्र सरकारने आमची या संकटातून कायमस्वरूपी मुक्तता करावी, डोळ्यात पाणी आणून बोलताना पूरग्रस्त पेडणेकर म्हणालेत.

पूर येणं, घरांमध्ये पाणी भरणं, लोकांचं नुकसान होणं या गोष्टी या भागातील लोकांसाठी आता ‘नेमीची येतो…’सारखं झालंय. मागच्या वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई आजतागायत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार असं आश्वासन देऊन जाणाऱ्या मंत्री, आमदारांवर तरी किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | BJP Goa | जे पी नड्डा यांचं गोव्यात दणक्यात स्वागत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!