उसवलं गणगोत सारं… आधार कुणाचा नाही! सत्तरीतील पूरग्रस्तांचा आक्रोश

आम्हाला कळतंच नाहीये, आता आम्ही काय करायचं…?

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपईः ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले’ अशीच काहीशी परिस्थिती सध्या सत्तरी तालुक्याची आहे. शुक्रवारी या भागात आलेल्या पुराने येथील असंख्य लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. काहीच्या उत्पन्नाचं स्त्रोत नाहीसं केलंय, तर काहींच्या डोक्यावरचं छप्परच काढून घेतलंय. शनिवारी पुराचं पाणी या भागात हळूहळू ओसरायला सुरुवात झालीए. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास गांवकर यांनी…

शुक्रवारी सत्तरीत येऊन धडकलेल्या पुराने सत्तरीवासियांचं बऱ्यापैकी नुकसान केलंय. बरीच घरं जमीनदोस्त झालीत, तर शेती-बागायतीत पाणी भरल्यानं लोकांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुराने हिरावून घेतलाय. काही ठिकाणी मोठ्या मेहनतीनं उभारलेलं घरकूल डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहण्याची वेळ लोकांवर आलीये. तर ज्यांच्या जीवावर रोजचे दोन घास मिळायचे ती गायी-गुरं पाण्यात वाहून जाताना पाहणं काहींच्या नशिबी आलंय. वाळपई, कुडशे, सोनाळ, वेळूस, पैकुळ, धामशे, भिरोंड, खडकी, सोनाळ, अडवई इ. गावांवर जणू निसर्गच कोपलाय.

शनिवारी हळूहळू पूराचं पाणी ओसरू लागल्यानंतर पूराशी लढून थकलेले लोक मागे उरलेल्या एक एक गोष्टी गोळा करू लागले. भिरोंड गावातील जॅरोन मॅस्केरेन्हास यांच्या 10 दुभत्या गायी शुक्रवीरी आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून मेल्या. मेलेल्या गायी दाखवताना मॅस्केरेन्हास भावूक झाले. म्हणाले, माझं नुकसान झालंय असं मी म्हणणार नाही… माझा आधार गेलाय… या गायींच्या दुधावर माझं घर चालायचं.. त्यांच्यामुळे चार घास सुखाचे मिळायचे आम्हाला…

पैकुळ गावचा पूल पुराच्या पाण्याने कोसळल्यानं गावचा शहराशी संपर्कच तुटलाय. हा पूलच गावात येण्याजाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यानं गावकऱ्यांची मोठी गैरसोय झालीये. गावात जाण्यासाठी दुसरी वाट बोंडला जंगलातून जाते. मात्र ती वाट जोखमीची. या रस्त्यावर जंगली जनावरांचा वावर असल्यानं या वाटेचा उपयोग जाण्यायेण्यासाठी करण्याची परवानगी वनाधिकाऱ्यांकडून मिळणं मुश्किल आहे. कोसळलेला पूल लवकरच उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी म्हटलंय खरं, मात्र तोपर्यंत निकडीचा प्रसंग आल्यास औषधपाण्यासाठी आम्ही करायचं काय? असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत. शनिवारी सरकारी यंत्रणांनी या ठिकाणी भेट दिली खरी. मात्र आता भेटी देऊन, पहाणी करून काही होणार नाही, तर लवकरात लवकर कृती करण्याची आवश्यकता आहे.

धामशे गावातील लोकांनी तर बोलणंच टाळलं. येथील लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांचं सामान वाहून गेलं. शनिवारी सकाळी पाणी कमी झाल्यानंतर लोक मागे राहिलेलं सामान गोळा करू लागले होते. काहींनी किती नुकसान झालं हे सांगितलं, मात्र काहींनी बोलण्यास साफ नकार दिला. जे नुकसान झालंय ते आमचं झालंय, त्यावर सरकारकडून कसलीच मदत मिळणार नाही हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुमच्यासमोर आमच्या दुःखाचं गाऱ्हाणं घालून काय होणार? असा प्रश्न विचारत या गावच्या लोकांनी सरकारवर अविश्वास दाखवलाय.

खडकी गावातील शिवाजीनगर वाड्यावरील 5 घरं जमिनदोस्त झालीत. हा वाडा हरीजनांचा आहे. घरटंच मोडून पडल्यानं कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आलीये. या घरातील तांदुळ, धान्य, अंथरूणं, कपडे सगळं सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलंय. सध्या या लोकांनी नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवार यांच्या घरी आपली पर्यायी सोय केलीये. मात्र हे असं किती दिवस जगायचं? असा सवाल या गरीब कुटुंबांनी केलाय.

खडकी तसंच आजुबाजुच्या गावांत गेले तीन दिवस लोकांच्या घरात अंधार आहे. वाळपईतील एई गेले 3 दिवस लाईट दुरुस्तीचा प्रयत्न करतायत. मात्र पाणी भरल्यानं तेदेखील हतबल झाले होते. आज सकाळी पाणी ओरसल्यानंतर त्यांनी लगेच वीजेच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. लोकांना लवकरात लवकर वीज पुरवणार असल्याचं ते म्हणालेत.

सोनाळ गावातील तार-सावर्डे येथे राहणारे शंबा गावकर यांच्या बागायतीत पाणी शिरून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. तर याच गावातील रणजीत राणेंच्या बागायतीत पाणी शिरल्यानं त्यांच्या जवळपास 2 ते 4 हजार केळी अक्षरशः मोडून पडल्यात.

नाणूस गोशाळेतील जवळपास 150 गुरे मृत्युमुखी दगावलीत. पैकी काही गुरं पाण्यात वाहून गेली असून त्यांचाही गुदमरून मृत्यू झालाय. या गुरांना गोठ्यात बांधून ठेवलेलं असल्यानं त्यांचं तिथून बाहेर पडणं मुश्किल झालं. मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. खड्डे खणून त्यांना पुरण्यात येतंय.

अडवई गावात एकाच ठिकाणी 4 घरं जमिदोस्त झालीत. प्रश्न निर्माण होतो तो सध्या या लोकांनी काय करायचं हा… सरकारची मदत रोख रकमेत मिळणारेय, मात्र सध्या त्यांनी काय करायचं असा प्रश्न लोक विचारतायतय.

दाबोस पाणी प्रकल्पात पुराचं पाणी शिरल्यानं सत्तरीत पाणी टंचाई निर्माण झाली. दरम्यान पुराचं पाणी ओरसल्यानंतर सहाय्यक अभियंता प्रशांत गावडे, पाणीपुरवठा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सोमा नाईक, कार्यकारी अभियंता नाँयल यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेतलं. शनिवारी सकाळी दहा एमएलडी क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. यामुळे रविवारी रात्रीपर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्वपदावर येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

पूरानंतर सत्तरीत जे चित्र दिसतंय ते भयानक आहे. लोक शून्य नजरेनं आभाळाकडे पाहताय.. अन् जणू म्हणतायत, आम्हाला कळतंच नाहीये, आता आम्ही काय करायचं…

हा व्हिडिओ पहाः FLOOD # INSPECTION- मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त पाहणी दौरा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!