विलास मेथर खूनप्रकरणी सिंधुदुर्गात दोघांना अटक

पर्वरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात होता हात. तळेरे गावात आढळले होते मोबाईल लोकेशन.

Goan Varta Live | प्रतिनिधी

कणकवली : तोर्डा-पर्वरी इथल्या विलास मेथर यांच्या खून प्रकरणात सहभाग असलेल्या दोघांना सिंधुदुर्ग पोलिसांनी पकडलं. सिंधुदुर्ग एलसीबी शाखेने तळेरेत ही कारवाई केली.

पर्वरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या खुनाच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी पवन श्रीकांत बडीगर रा. म्हापसा आणि प्रशांत लक्ष्मण दाभोलकर यांचे मोबाईल लोकेशन तळेरे गावात आढळले होते. एसपी दाभाडे, अतिरिक्त एस. पी. तुषार पाटील यांच्या आदेशानुसार एलसीबी निरीक्षक धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस उपनिरीक्षक सचिन एम. शेळके यांच्या पथकाने तळेरे गावात दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

आलिशान फॉर्च्युनर कारमधून (क्र. जीए-03-वाय-0990) प्रवास करताना दोन्ही संशयितांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींना कणकवली पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जिवबा दळवी (Jivba Dalvi) आपल्या पथकासह कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. पर्वरी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नं. 131/2020 नुसार भा.दं.वि.302 मधील गुन्ह्यातील वरील दोन्ही आरोपी असल्याची माहिती समोर आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गोवा पोलीस रवाना झाले.

पीएसआय सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस नाईक कृष्णा केसरकर, जयेश सरमळकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, संकेत खाडये आदी कारवाईत सहभागी झाले होते.

मूळ हरमल इथल्या मेथर यांचा बिल्डरशी फ्लॅटच्या कागदपत्रांवरून वाद सुरू होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!