सिद्धी नाईकची हत्याच झाली? वडिलांची पोलिसात नव्यानं तक्रार

सिद्धी नाईक संशयित मृत्यूप्रकरणाला नवं वळण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे सिद्धी नाईक संशयित मृत्यूप्रकरणाचा गुंता सुटत नाहीये. अशातच या मृत्यूप्रकरणाला आता नवं वळण लागलंय. कारण सिद्धीच्या वडिलांनी सिद्धीची हत्या झाल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर नव्यानं कळंगुट पोलिस स्थानकात हत्येची तक्रारही दाखल केली आहे.

हत्या की आत्महत्या?

सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी दाखल केलेल्या या तक्रारीमुळे पोलिसांसमोरची आव्हानंही वाढली आहे आहेत. या संपूर्ण मृत्यूप्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. अर्धनग्न अवस्थेत सिद्धीचा मृतदेह आढळून आल्यानं अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रोज नवनवे खुलासे या मृत्यूप्रकरणाबाबत समोर येत होते. मात्र अद्यापही या मृत्यूप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. अशातच सिद्धीच्या नाईकच्या वडिलांनी कळंगुट पोलीस स्थानकात जाऊन आपल्या मुलीची हत्याच झाली असल्याचा दावा करत तक्रार दाखल केली आहे.

याआधीही सिद्धीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सिद्धीची हत्याच झाली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर वडिलांसह सिद्धीच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी झाली होती. मात्र या चौकशीनंतर कुटुंबीयांवरही संशयानं पाहिलं जात होतं. अशातच आता वडिलांनी हत्येची तक्रार कळंगुट पोलिसांत दिल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय.

तर दुसरीकडे सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट गोपनीय ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. त्यानंतर आता या अहवालातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सिद्धीच्या मृतदेहावर तीन जखमा आढळून आल्या होत्या. या जखमांमुळे सिद्धीच्या मृत्यूबाबतचं गूढ आणखीनंच वाढलं होतं. अशातच आता सिद्धीच्या शरीरावर असलेल्या 3 मोठ्या जखमा या मृत्यूपूर्वीच्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, सिद्धीचा व्हिसेरा राखून का ठेवण्यात आला नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे जे काही वर्षांपूर्वी स्कार्लेट किलिंगप्रकरणी घडलं होतं, त्याची पुन्हा एकदा आठवण ताजी झाली आहे. दरम्यान, ज्या दिवशी सिद्धीचा मृतदेह कळंगुट किनाऱ्यावर आढळला होता, त्याच दिवशी संध्याकाळी तिचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

व्हिसेरा म्हणजे?

सिद्धीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट कुटुंबियांना देण्यात आल्यानंतर या संदर्भातल्या बाबी समोर आल्या आहेत. सिद्धीच्या पायावर दोन तर इतर एका ठिकणी एक जखम आढळून आली होती. एकूण 3 मोठ्या जखमा सिद्धीच्या शरिरावर होत्या. या तिन्ही जखमा या मृत्यूपूर्वीच्या असल्याचं फॉरेन्सिक विभागाकडूनही मान्य करण्यात आलंय. असं असतानाही तिचा मृत्यू बुडून झाल्याचं लगेचच सांगण्यात आलं. या निष्कर्षावर पोहचण्यासाठी घाई तर करण्यात आली नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे सिद्धीची व्हिसेरा का केली गेली नाही, यावरुन आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. व्हिसेराची गरज या संशयित मृत्यूप्रकरणी कुणालाच का भासली नाही, हा खरा प्रश्न आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद मृत्यू प्रकरणात शरीराची बाह्य आणि अंतर्गत तपासणी केल्यानंतरही मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला. हे डॉक्टरांना ठोसपणे सांगता येत नाही. यावेळी मृतदेहाचा व्हिसेरा काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला जातो. शरीरातील काही अवयव, रक्त पुढील तपासणीसाठी काढून ठेवलं जातं. याला व्हिसेरा असं म्हणतात. पोट, आतडं किंवा यकृत, किडनी आणि स्प्लिनचा काही भाग, 20 CC रक्त व्हिसेरा म्हणून जपून ठेवलं जातं.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू इंजेक्शनमुळे झाला असेल तर, इंजेक्शन दिलेल्या जागेच्या चामडीचा काही भाग, मांस तपासणीसाठी जपून ठेवलं जातं. मृताच्या शरीराचा भाग व्हिसेरा केमिकल पडताळणीसाठी फॉरेंन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो.

या अनुत्तरीत प्रश्नांमुळे गुंता वाढला?

सिद्धी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कोणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!