सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणः सिद्धीच्या मृत्यूपूर्वी कुंटुंबात क्लेश, हाणामारी

वडिलांनी सिद्धीवर हात उचलला; तुम्हाला माझा मृतदेह पहायला मिळेत म्हणत सिद्धीने दिली होती घरच्यांना धमकी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गुंतागुंतीचं बनत चाललेल्या सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचे धागेदोरे हळुहळू उलगडत आहेत. पोलिस तपासात मिळालेल्या पुराव्यांची सुई आता सिद्धीच्या कुटुंबियांच्याच दिशेने वळताना दिसतेय. सिद्धीच्या मृत्यूपूर्वी 3 दिवस अगोदर सिद्धीच्या घरात क्लेश सुरू असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळ वळण मिळतंय.

हेही वाचाः रुद्रेश्वर पणजीतर्फे ‘गोमंतस्वर’चे आयोजन

मृत्यूपूर्वी 3 दिवस अगोदर जोराचं भांडण

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सिद्धी आगरवाडा पेडणे येथील तिच्या मावशीच्या घरी राहत होती. तिची आगरवाडा येथील मावस बहीण आणि सिद्धी पर्वरी येथील नामांकित मॉलमध्ये कामाला होते. सिद्धीचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्याआधी चार दिवसांपूर्वी आगरवाडा येथे दोघांचंही जोमाने भांडण तसंच हाणामारी झाली होती. त्यांच्या कुटुंबियांत वाद निर्माण झाला होता. ही माहिती सिद्धीचे वडील संदीप यांना माहीत झाल्यावर त्यांनी तीन दिवसांपूर्वी सिद्धीला आगारवाडा येथे जाऊन आपल्या नास्नोळा येथे घरी आणलं होतं. त्यानंतर वडिलांनी सिद्धीला चोपही दिला होता.

सिद्धी होती तणावाखाली

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, आगरवाडा येथे झालेलं भांडण, हाणामारी तसंच वडिलांनी चोप दिल्यामुळे सिद्धी तणावाखाली होती. त्या रागानेच सिद्धी घराबाहेर पडली होती, अशी माहिती आता पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी सिद्धीची मावस बहीण अस्मिता हिची जबानी नोंद करुन घेतली आहे. अस्मिताने आपल्या पोलीस जबानीत पोलिसांना बरंच काही उघड केलं आहे. त्याच दिशेने पोलिसांनी आपलं चक्र फिरवून तपासाला वेग दिला आहे.

हेही वाचाः राजीव गांधींनी गोव्याला राज्याचा दर्जा दिला, तर भाजपने गोव्याचं भांडवलदारांच्या वसाहतीत परिवर्तन केलं

सिद्धी होती बऱ्याच मुलांच्या संपर्कात

दरम्यान काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असंही समजतंय की सिद्धीला बरेच मित्र होते. ती विविध मुलांच्या संपर्कात होती. ती आईवडिलांपासून दूर राहत असल्याने तिला विचारणारं कोणीच नव्हतं. नास्नोळा येथील तिच्या घरी सतत तिच्यावर आईवडिलांचं दडपण असल्यानं तिने आगरवाडा येथील तिच्या मावशीच्या घरी राहणं पसंत केलं होतं. एका मुलावरून आगरवाडा येथे जोमानं भांडणं तसंच हाणामारीही झाली होती. मात्र हाणामारीचं नेमकं कारण काय ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्या दिशेने पोलिसांचा शोध सुरू आहे. तसंच या प्रकरणाचा लवकरच छडा लावणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सिद्धी आणि तिची छोटी बहीण १२ ते १४ तास मुलांबरोबर बोलत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. शिवाय तिच्या मावस बहिणीने सर्व माहिती पोलिसांसमोर उघड केली आहे.

हेही वाचाः विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन करा; लस घेण्यासाठी विद्यार्थी खूप लहान

तुम्हाला माझा मृतदेह पाहायला मिळेल

सुत्रांनी दिलेल्या माहितीतून असंही समोर आलंय, की सिद्धीने आईवडिलांना धमकी देत म्हणाली होती की तुम्हाला माझा मृतदेह पहायला मिळेल. मात्र तिने अशी धमकी देण्यामागचं कारण काय? हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच कळंगुट समुद्रकिनारी सिद्धीचा मृतदेह सापडताच सर्वप्रथम तिच्या बहिणीला मॅसेज आला असल्याचंही समजतंय. त्यामुळे यातून बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या सगळ्याने सिद्धीच्या कुटुंबियांनाच संशयाच्या घेऱ्यात अडकवलं आहे. आपण यात फसत चाललोय असं लक्षात येताच वडिलांनी कुणाशीही बोलणं टाळलंय. अर्धनग्न अवस्थेत सिद्धीचा मृतदेह समुद्रात कुठून आणि कसा आला, हा प्रश्न अजूनही कायम आहे. सिद्धीच्या मृत्यूमागे नेमकं काय गुढ आहे, याची उत्सुकता प्रत्येकाला लागून आहे.

सिद्धीचे कपडे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास

दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस कळंगुट पोलिसांनी मयत सिद्धीचे कपडे शोधण्यासाठी बागा, कळंगुट, कांदोळी, शिकेरी, वेरे आदी किनारी परिसर पिंजून काढला. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. एलआयबी टीम, रिझर्व्ह बटालीयन, पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक या सर्वांना या दोन दिवसांत याच कामाला लावण्यात आलं आहे. दरम्यान नेरुल खडप भागात समुद्र किनाऱ्याशेजारी काही काडे पोलिसांना आढळून आले. मात्र पोलिस तपासात ते सिद्धीचे नसल्याचं आढळून आलं आहे, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर येतंय.

हेही वाचाः बहुजन समाज नेते मनोज कुमार घाडी ‘आप’मध्ये सामील

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले

सुत्रांच्या माहितीप्रमाणे गुरुवारी दिवसभर ते शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व पोलीस कर्मचान्यांनी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली किनारी भागात असलेली हॉटेल्स, शॅक्स आदी ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज घेण्यासाठी पाठविण्यात आलं होतं. पोलिसांनी याबाबत सर्वत्र सखोल चौकशी केली आहे. नेरुल भागात एक स्कूटरवरून रात्रीच्यावेळी एक मुलगी गेल्याचं आढळून आलं आहे. त्याची बारकाईने चौकशी केली असता ती मुलगी सिद्धी नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या होडीवाल्यांनी त्या दिवशी रात्रीच्यावेळी एक मुलगी रडत जाताना पाहिली होती, असं पोलिसांना सांगितलं असता पोलिसांनी नेरुल भागातील त्या दोन दिवसाचे सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहिले. मात्र पोलिसांना तसं काहीच आढळून आलं नसल्याचं सांगण्यात आलं.

हेही वाचाः म्हापशात गाळेवजा दुकान फोडले; दोघांना अटक

काय आहे प्रकरण?

11 ऑगस्ट रोजी नास्नोळा येथील 19 वर्षीय युवती सिद्धी नाईक ग्रीन पार्क जंक्शन वरून बेपत्ता झाली. सिद्धी ही पर्वरी येथे एका दुकानावर काम करत होती. 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांनी तिला प्रवासी बसमधून पर्वरीला जाण्यासाठी ग्रीन पार्क जंक्शनवर नेऊन सोडलं.

सकाळी १०.३० वा. तिच्या कामावरून ती दुकानात पोचली नसल्याचं फोन करून सांगण्यात आलं. शिवाय तिचा फोन लागत नव्हता. तिने आपला फोन घरीच ठेवलेला नंतर सापडला. याबाबत तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल केली.

हेही वाचाः सहकार अर्बन क्रेडिट सहकारी सोसायटीवर प्रशासक नेमा

बेपत्ता होण्यापूर्वी सिद्धीनेच्या फोनमधील फेसबूक आणि वॉट्सएप हे दोन्ही एप डिलीट करण्यात आले होते. मात्र ते कुणी डिलीट केले हा प्रश्न अद्याप कायम आहे.

बेपत्ता असलेल्या सिद्धीचा मृतदेह 12 ऑगस्ट रोजी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने अनेक तर्ककुतर्क व्यक्त केले जातायत. शवचिकित्सा अहवालातून सिद्धीचा मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट झालं. तसंच तिनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्यामुळे अनेक तर्ककुतर्कही व्यक्त केले जातायत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Breaking | Siddhi Naik Death Case | Crime | सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा लवकरच छडा

सिद्धीच्या मृत्यूचं गुढ अन् अनुत्तरीत असंख्य प्रश्न

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाशी संबंध अनुत्तरीत प्रश्नांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.

म्हापशातून गायब झालेली सिद्धी चार तास कुठे होती?

वडिलांचं घर सोडूून पणजीला जाण्यामागचं कारण काय?

त्वरित म्हापसा पोलीस स्थानकात सिद्धी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यामागील कारण काय?

सिध्दी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही ?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कुणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सऍप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

मानसिक तणावाखाली असलेल्या सिद्धीवर कुणाचा दबाव होता?

19 वर्षीय सिद्धीसोबत असं काय घडलं होती की जे ती घरच्यांपासून लपवत होती?

सिद्धीचा घरच्यांसोबत नेमका काय वाद झाला होता?

घरच्यांनी सिद्धीचा मोबाईल फोन का काढून घेतला होता?

असे आणि इतर बरेच प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Panchnama | Crime | Siddhi Death Case | सिद्धी नाईकला वाचवणं खरंच शक्य नव्हतं का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!