सिद्धी नाईक प्रकरण: बस वाहकाने नोकरी गमावली

पुन्हा पुन्हा पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जात असल्याने मालकाने नोकरीवरून कमी केले

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: नास्नोळा येथील मयत सिद्धी नाईक ही बेपत्ता होण्यापूर्वी ज्या बस वाहकाने तिला शेवटचं पाहिलं होतं, त्याला आता आपली नोकरी गमवावी लागली आहे. पुन्हा पुन्हा पोलिस चौकशीसाठी पाचारण करीत असल्यानं बस मालकाने त्याला कामावरून कमी केलं आहे. करोना महामारी काळात नोकरी जाण्याची नामुष्की त्याच्यावर ओढविली आहे.

हेही वाचाः शाळेपासून दूर राहिल्यानं विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडतंय

सिद्धी नाईक प्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती काहीच ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. ज्या दिवशी ती बेपत्ता झाली त्या दिवशी म्हापसा पोलिस स्थानकावर या खासगी बस वाहकाने तिला पाहिलं होतं. सिद्धीच्या वडिलांनी तिला कामावर जाण्यासाठी ग्रीनपार्क जंक्शनवर सोडलं होतं. त्यानंतर सिद्धीला प्रत्यक्ष पाहणारा हा वाहकच असल्याचं चौकशीतून समोर आलं होतं.

खासगी बस वाहकाची सिद्धी ही वर्ग मैत्रीण

या खासगी बस वाहकाची सिद्धी ही वर्ग मैत्रीण होती. आपण सिद्धीला बेपत्ता होण्याच्या दिवशी म्हापसा बस स्थानकावर सकाळी 11.30 वा. पाहिलं होतं. ती शिवोली-मोरजी बसेस थांबतात त्याबाजूने उभी होती. यावेळी सिद्धी आपल्याच विचारात मग्न होती आणि स्वतःच तोंडात पुटपुटत होती, असं त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं आहे. मला त्यावेळी सिद्धी अवस्थ आणि तणावाखाली असल्याचं दिसलं. म्हापसा-पणजी मार्गावरील बसवर हा वाहक होता. त्याची बस बसस्थानकावरून निघेपर्यंत सिद्धी त्याच ठिकाणी उभी होती. सिद्धीने जांभळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट घातली होती, असंही त्याने जबानीत म्हटलं आहे.

हेही वाचाः अब तक 56! सेन्सेक्स 56 हजाराच्या पार, शेअर बाजारात नवा विक्रम

दुसऱ्याला मदत करण्याच्या नादात माझी नोकरी गेली

सोशल मीडियावर मयत सिद्धीचा आपण फोटो पाहिला. त्यात ती बेपत्ता झाल्याचं समजलं. त्यानंतर आपण सोशल मीडियावरील त्या पोस्टवरील फोन क्रमांकाशी संपर्क साधला. तो तिच्या वडिलांनी घेतला. त्यांना मी सिद्धीविषयी सांगितलं. त्यानंतर म्हापसा पोलिस स्थानकातून मला फोन आला. पोलिसांनी माझी जबानी नोंदवून घेतली, असं तो वाहक म्हणाला. या प्रकारानंतर पुन्हा पुन्हा पोलिस मला बोलावून चौकशीसाठी नेत आहेत. यामुळे माझी नोकरी गेली आहे. मालकाने मला कामावरून कमी केलं आहे. दुसर्‍यांना मदत करण्याच्या नादात स्वतःचं काम मी गमावून बसलो आहे. यात माझा काय दोष आहे, असा सवाल हा बस वाहक विचारतोय.

हेही वाचाः सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! वीज आणि आरोग्य खात्यात नोकरी हवी असेल, तर लगेचच अर्ज करा!

सिद्धीचा गुढ मृत्यू अन् असंख्य अनुत्तरित प्रश्न

मयत सिद्धी नाईक ही युवती बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह आक्षेपार्ह स्थितीत कळंगुट समुद्रकिनारी सापडला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तिचा मृतदेह अर्धविवस्त्रावस्थेत किनारी कसा पोचला? तिचे कपडे आणि चप्पल कुठे आहे? ती कळंगुटला कशी पोचली? या उपस्थित झालेल्या शंका पोलिसांना सोडता आलेल्या नाहीत.
दरम्यान कळंगुट पोलिसांनी कळंगुट आणि बागा परिसरातील सर्व आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहाणी केली. दुपारी 12 ते मध्यरात्री पर्यंत कळंगुट बागा समुद्रकिनार्‍यावरील एकाही आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धी दिसलेली नाही. पोलिसांनी तिच्या वडिलांसोबत देखील काही सीसीटीव्हींची पडताळणी केली. पण हाती काहीच लागलेलं नाही.

हेही वाचाः घाबरू नका, सर्वांना माफी, इस्लामिक कायद्यानुसार महिलांचं संरक्षण…

गुढी अजूनही कायम

शिवाय सिद्धीच्या वडिलांनी बसमध्ये तिला बसवलं होतं. त्यापासून 11.30 पर्यंतच्या पर्वरीहून म्हापसाच्या दिशेने येणार्‍या सर्व प्रवासी बसचे चालक आणि वाहकांची चौकशी केली. पण ती कोणत्या बसने म्हापसा बस स्थानकावर आली होती, हे समजू शकलेलं नाही. त्यामुळे ती बेपत्ता होणं आणि तिचा मृतदेह अशा आक्षेपार्ह स्थितीत सापडणं, याबाबतचं गुढ सुटलेलं नाही.

गेले वर्षंभर कॅमेरे बंद

दोन वर्षापुर्वी जून 2019 मध्ये कळंगुट पंचायतीने गावातील मोक्याच्या ठिकाणी तसंच समुद्रकिनारी सीसीटीव्हीचं जाळे उभारलं होतं. या पर्यटनस्थळी होणार्‍या चोर्‍या आणि इतर अनैतिक प्रकार तसंच अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी या कॅमेरांद्वारे पोलिसांमार्फत टेळहाणी केली जात होती. पण काही दिवस चालल्यानंतर हे कॅमेरे गेल्या वर्षभरापासून बंदस्थितीत आहेत. हे कॅमेरे कार्यरत असले असते तर मयत सिद्धी नाईक कळंगुटमध्ये कशी पोचली, याचा उलघडा होऊ शकला असता.

हेही वाचाः देशाच्या रक्षणासाठी सैनिकांचा त्याग लाखमोलाचा

जबानीतून काहीच स्पष्ट नाही

कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी सिद्धी नाईक हिचे तीन मित्र आणि इतर काही लोक मिळून 10-12 जणांच्या जबानी नोंद करून घेतल्या आहेत. पण या जबानीतून तिच्या मृत्यू बाबतीत कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. शिवाय पोलिसांनी तिच्या कुटुंबियांचीदेखील जबानी घेतलेली आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | BHAUSAHEB BANDODKAR | भाऊ एक उत्तूंग व्यक्तीमत्व

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!