श्यामू ! आता गाऱ्हाणे कोण घालणार?

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी
ब्युरो : म्हापशातील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर म्हणजे सर्वांचा राखणदार. श्रद्धा – अंधश्रद्धा हा विषय निराळा पण बोडगेश्वरावर श्रद्धा ठेवणारे अगणित भक्तगण आहेत. उत्तर गोव्यातील श्री लईराईनंतर श्री बोडगेश्वराचीच सर्वांत मोठी जत्रा भरते. म्हापशात दाखल झाल्यानंतर श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय कुणीच राहत नाही. ह्याच बोडगेश्वरापर्यंत आपले सांगणे मांडणारा आणि आपल्या एका विशिष्ट स्टाईलने गाऱ्हाणे घालणारा विठ्ठल उर्फ श्याम आणि सर्वांचा लाडका श्यामू गांवकर (पुजारी) गेला. ही खबर धक्कादायकच होती. समस्त भक्तगण हळहळले. श्यामू म्हणजे या देवस्थानाची शान. श्यामू म्हणजे या देवस्थानाची एक आगळीवेगळी ओळख. आपल्या गडगंज आवाजाने गाऱ्हाणे घालून संपूर्ण मंदिर परिसर जागृत ठेवणारा आणि म्हापसेकरांवर तसेच मंदिरात भेट देणाऱ्यांवर आपली एक विशिष्ट माया आणि स्नेहभाव ठेवणारा श्यामू गांवकर गेल्याने ही पोकळी आता कदापी भरून येणार नाही.
गोवा ही देवभूमी आहे. इथे भव्यदीव्य आणि वैभवाचे दर्शन घडवणारी अनेक देऊळे आहेत, पण त्याचबरोबर निर्सगाशी घट्ट नातं सांगणारी लोकदेवतेही आहेत. या लोकदेवतांवरच आपल्या नशिबाचा भार टाकून लाखो कुटुंबे रोज जगण्याशी टक्कर देत असतात. असंख्य अडचणी, आव्हाने, संकटे पार करीत असतात. इथे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा किंवा समर्थन करण्याचा प्रश्न नाही. पण श्रद्धेच्या बळावर माणसाला जगण्याची ताकद मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे.
देव आणि भक्त यांच्यामधला दुवा म्हणजे पुजारी.

अर्थात बहुतांश ठिकाणी ब्राह्मण पुजारी असतात. त्यातही काही खास ब्राम्हण पुजारी हे लोकप्रिय असतात. भक्ताच्या मनातील दुःखे, वेदना ते चांगल्या पद्धतीनं समजू शकतात आणि त्यातूनच देवाकडे आलेल्या भक्तांना दोन चांगले शब्द सांगून आणि त्यांची व्यथा देवासमोर मांडून ते त्यांना निर्धास्त बनवतात. आता उडदामाजी काळेगोरे या उक्तीप्रमाणे भक्तांची लुबाडणूक करणारे आपल्याला जळीस्थळी भेटतीलच पण म्हणून त्यांच्यामुळे चांगल्यांची दखल घेतली का घेतली जाऊ नये. श्यामू गांवकर हा भक्तांशी एक अनोखे नाते जोडून ठेवणाऱ्यापैकीतला होता. तो मूळ शिरगांवचा. म्हणजे श्री देवी लईराईचा लेक. बोडगेश्वर मंदिरात अगदी माझ्या बालपणापासून श्यामू यांना मी पाहीले आहे. अर्थात माझे बालपण आणि शिक्षण हे म्हापशात झाल्याने श्यामूचा चेहरा अगदी डोळ्यांसमोर येतो.
चेहऱ्यावर स्मीतहास्य, गडगंज आवाज. त्याचे सांगणे (गाऱ्हाणे ) म्हणजे प्रत्यक्ष श्री देव बोडगेश्वराला जाग यायलाच हवी. त्याच्या गाऱ्हाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची देवाला सांगणे करण्याची अधिकारवाणी. ही अधिकारवाणी गाजवण्याचा अधिकार हा फक्त त्याचाच. देवळात कुणीही अतिमहनीय किंवा विशेष व्हिआयपी आले की तिथे श्यामू याचेच गाऱ्हाणे चालायचे. ते नेमके काय गाऱ्हाणे घालायचे हे कुणालाही कळत नसे. फक्त काही विशिष्ट शब्दच कळायचे पण आपल्यासाठी काहीतरी चांगलं देवाकडे ते मागताहेत आणि सगळ्याबाजूने आपलं रक्षण कर असं देवाला सांगताहेत हे मात्र भक्तांना नेमकं कळायचं. गाऱ्हाणे सुरू झाल्यानंतर फक्त तुमचे नाव तेवढं तुम्हाला कळायचं पण पुढची भाषा ही कदाचित श्याम आणि देवाला कळणारी कोडभाषाच असावी, पण या कोडभाषेत एक प्रचंड आत्मियता, स्नेह आणि प्रेमभाव असायचा.
— Goanvartalive (@goanvartalive) January 19, 2021
मंदिरात गेल्यानंतर आपल्याला असे अनेक पुजारी किंवा सेवेकरी भेटतात. अनेकजण निस्वार्थी भावनेतून सेवा करतात तर अनेकजण अपेक्षेने तिथे सेवा करताना दिसतात. भक्तगण ताटात कितीची नोट घालतो किंवा हातात काय टेकवतो याकडे काहीजणांचे अधिक लक्ष असते. श्यामू हा सर्वांपेक्षा निराळा होता. त्याच्याबाबतीत फक्त भक्तांवर देवकृपा व्हावी ही एकमेव इच्छा. त्याचा हा गुण हीच त्याची खरी ताकद. म्हणूनच त्याच्या अचानक जाण्याची खबर धडकताच समस्त श्री देव बोडगेश्वराच्या भक्तगणात हळहळ व्यक्त झाली. त्याच्या निस्वार्थी आणि निस्सीम सेवेची हीच तर पोचपावती आहे.