चकीत करणारी बातमी : लॉकडाऊन काळात पतिराजांचा होतोय छळ !

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कोरोनाच्या काळात कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाल्याच्या घटना कानावर येत होत्याच, पण त्यातही एक धक्कादायक माहिती ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानुसार समोर येतीय. कोरोनामुळे गेल्या दिड वर्षांपासून जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. या दरम्यान, घरी चोवीस तास सोबत राहत असल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे वाढत आहेत. चकीत करणारी गोष्ट म्हणजे पतींचा जास्त छळ झाल्याचं दिसून येतंय. पुण्याच्या ट्रस्ट सेलने हा दावा केला आहे की, लॉकडाऊन दरम्यान घरांमध्ये राहणाऱ्या पतींचा लॉकडाऊनमुळे आधीच्या तुलनेत पत्नींकडून जास्त छळ झाला आहे.
ट्रस्ट सेलच्या प्रमुख सुजाता शानमे यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या आधीच्या एक वर्षादरम्यान 1283 लोकांनी पुण्याच्या ट्रस्ट सेलमध्ये कौटुंबिक वादाची तक्रार दाखल केली होती. यामध्ये पत्नींची संख्या 791 होती, तर पतीची संख्या केवळ 252 होती. मात्र लॉकडाऊन दरम्यान, म्हणजेच गेल्या 15 महिन्यांपासून हा आकडा वाढून 3,075 पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये पतींविरोधात तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या 1540 आहे. तर पुरुषांची संख्या 1535 आहे. म्हणजेच तक्रार करणाऱ्या पुरुषांची संख्या लॉकडाऊनच्या पहिले एक वर्षांच्या तुलनेत 6 पटींनी वाढली आहे.
सुजाता यांच्यानुसार, गेल्या दीड वर्षांच्या दरम्यान घरगुती कलहाच्या तीन हजारांपेक्षा जास्त केस दाखल झाल्या आहेत. यामध्ये जास्तीत जास्त केस मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाच्या आहेत. काही तक्रारींमध्ये हा दावाही करण्यात आला आहे की, त्यांच्या पत्नी भांडणे करुन मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेल्या आहेत आणि आता त्या परत येत नाहीतेय. सुजाता यांनी सांगितले की, 24 तास बंद खोलीत राहत असल्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. पती-पत्नी, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भाडत आहेत. आम्ही अशा लोकांना येथे बोलावून किंवा मग ऑनलाइन माध्यमातून त्यांची काउंसिलिंग करुन समजूत घालण्याचा प्रयत्न करतो.