आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील त्रुटी मान्य करा

'गार्ड'चं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवाहन; जीएमसीत ऑक्सिजनची कमतरता असल्याची डॉक्टर्सकडून कबुली; जीएमसीच्या डीनला पत्र लिहून हॉस्पिटलमधील वाईट परिस्थितीची केली तक्रार

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः जीएमसीत कोविड वॉर्ड्समधला ऑक्सिजन पुरवठा पुरेसा नाही. सेंट्रल ऑक्सिजनचा फ्लो कधीकधी खूप कमी ऑक्सिजन फ्लो करतो आणि त्यामुळे एनआयव्ही तसंच व्हेंटिलेटर्स प्रभावीपणे काम करू शकत नाही. तसंच रुग्णांना लावलेले ऑक्सिजन सिलिंडर मध्यरात्री संपतात आणि बदलीचा सिलिंडर येण्यास किमान २-३ तास लागतात, कधीकधी त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. दरम्यान रुग्ण ऑक्सिजनशिवाय तडफडतो, असं ‘गार्ड’ने ‘जीएमसी’च्या डीनला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (गार्ड)ने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी)च्या डीनला पत्र लिहून हॉस्पिटल्समधील वाईट परिस्थितीची तक्रार केलीये.

कृपया खोटी माहिती देऊ नका

असे अनेक गंभीर रुग्ण आहेत, ज्यांना ट्रॉली आणि फरशीवर तसंच क्रिटिकल कोविड वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतंय. 30 खाटांची क्षमता असलेल्या वॉर्डमध्ये 50 रुग्णांना ठेवण्यात आलंय. दर दिवशी वर्तमानपत्रातून वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यात ऑक्सिजन तसंच खाटांचा तुटवडा नसल्याची मोठमोठी वक्तव्य वाचनात येतात. आणि मग रुग्णांचे नातेवाईक कॅज्युअल्टीमधील डॉक्टर्स आणि नर्सेसना प्रश्न करतात, की जर खाटांची कमतरता नाही, तर आमच्या रुग्णाला ट्रॉली/व्हिलचेअर/जमीनीवर का झोपवलंय? आमच्या रुग्णाला ऑक्सिजन का मिळत नाहीये. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नसतात, असं ‘गार्ड’ने पत्रात म्हटलंय.

हेही वाचाः कोविड व्यवस्थापन कृतीदलाकडे सोपवा

जीएमसीतील वास्तविक परिस्थिती

सरकारी ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक स्वतःच्या पैशाने खासगी ऑक्सिजन विकत आणत आहेत आणि त्यांच्या रुग्णाला वाचवण्याचा आटापिटा करत आहेत. हॉस्पिटलमध्ये एडमिट असूनही रुग्णाला ऑक्सिजनसाठी तडफडावं लागतंय हे खरंच खूप वाईट आहे. कधी कधी यात रुग्णाचा मृत्यू होतोय. अशा प्रसंगी आम्ही असहाय्य बनलोय. हे निव्वळ गैरव्यवस्थापनामुळे होतंय. परिस्थिती एवढी वाईट आहे की एका वॉर्डमध्ये 60 ते 80 रुग्ण असल्यामुळे चालायलाही जागा नाही. हे सगळं खूप दुर्दैवी आहे.

हेही वाचाः लॉकडाऊनची सरकारला एलर्जी

रुग्णाच्या नातेवाईंच्या रागाचे रेसिडंट डॉक्टर्स शिकार

मध्यरात्री जेव्हा ऑक्सिजन सिलिंडर संपतो, रुग्णाची अवस्था गंभीर होते, कधीकधी रुग्णाचे प्राणही जातात. अशावेळी ड्युटीवर असलेल्या ज्युनिअर डॉकर्सना रुग्णाच्या नातेवाईकांच्या संतापाला सामोरं जावं लागतं. अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकांचा राग ड्युटीवर असलेल्या रेसिडेंट डॉक्टरवर निघतो. रुग्णाला वाचवण्यासाठी आमची आमचं 100 टक्के देतो, तरी आम्हाला ही अपमानास्पद वागणूक का? असा प्रश्न ‘गार्ड’ने पत्रात केलाय.

हेही वाचाः भाजपच्या वैद्यकीय विभागाने सवंग प्रसिद्धी थांबवावी!

डॉक्टर्सच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या

‘गार्ड’ने केलेली वाढीव सुरक्षेची मागणी अधिकाऱ्यांनी अजून पूर्ण केलेली नाही. सगळ्या कोविड वॉर्डमध्ये व्यवस्थित काम करणारे सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत. एचसीडब्ल्यूवरील हिंसाचारावर कायद्याने ठामपणे कारवाई केली जाईल यावर भर देणारे पोस्टर्स आणि चिन्हे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये लावण्याची गरज असल्याचंही ‘गार्ड’ने पत्रात नमूद केलंय. कोविड तसंच कॅज्युअल्टी वॉर्डच्या बाहेर सशस्त्र गार्ड्स/पोलिस कर्मचारी तैनात करण्याची आवश्यकता आहे.

व्हीआयपी संस्कृती अजूनही प्रचलित

या महामारीच्या काळातही व्हीआयपी संस्कृती अजूनही खूप प्रचलित आहे. एका कोविड कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये एक रेसिडंट डॉक्टर 30 पेक्षा जास्त रुग्णांवर लक्ष देतोय. अशात हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या व्हीआयपी पेशंटकडे प्राधान्याने लक्ष देण्यास, आवश्यकता नसताना त्याला तात्काळ एडमिट करून घेण्यास सांगितलं जातं. या सगळ्यात 2-3 तास वाट पाहत बसलेले गंभीर रुग्ण मग पुन्हा डॉक्टर्सच्या अंगावर धावून येतात, अशी तक्रारही ‘गार्ड’कडून पत्रात करण्यात आलीये.

हेही वाचाः आता सीमा नियंत्रणासह लॉकडाऊन वाढवणं हा एकच पर्याय

आश्वासनं… आश्वासनं… फक्त आश्वासनं…

नवीन कोविड सुविधा सुरू करत असल्याचं रोज सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात मात्र नवीन स्टाफ किंवा डॉक्टर्सची नियुक्ती अद्याप झालेली नाही. एसजीडीएच, ईएसआय आणि जीएमसी व्यतिरिक्त आम्ही या अतिरिक्त सुविधांचं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे का? असा प्रश्न ‘गार्ड’ने केलाय. सध्या एक डॉक्टर 30 हून अधिक रुग्णांची काळजी घेतोय, तर काही डॉक्टर्स हे 24 तासांची शिफ्ट करत आहेत. त्यांना अधिक काम करायला लावणं हीच प्रशासनाची पुढील योजना आहे का?” असा सवालही ‘गार्ड’कडून उपस्थित करण्यात आलाय.

हेही वाचाः दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनू प्रिया यांचं निधन

आश्वासनं पुरेत, आता कृती करा

कृपया आमच्या समस्यांकडे लक्ष द्या आणि आम्हाला फक्त तोंडी आश्वासनं नकोत, त्वरित कृती करण्याची गरज आहे, नाहीतर काहीतरी विनाशकारी घडू शकतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या त्रुटी मान्य करण्याचं आवाहन करतो, जेणेकरून रुग्णांना रुग्णालयात आल्यावर काय अपेक्षा करावी हे कळेल, असं आवाहन ‘गार्ड’कडून करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!