गोवा आणि गाईबद्दल ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी गोव्यासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. गोव्यात गोवंश हत्या बंदी का नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.
गोहत्येचा प्रश्न हा देशात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आलंय.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय?
इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता!
गोव्यात गोवंश हत्या बंदी का नाही?
खरंच गोव्यात गोवंश हत्या बंदी नाही?
गोव्यात गोवंश हत्याबंदीबाबत गोवनवार्ता लाईव्हने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गोव्यामध्ये गोवंश हत्याबंदी असल्याचं आमच्या अभ्यासातून उघड झालंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन गोव्यातील सत्ताधारी भाजप पक्षही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असणार हे नक्की.
हेही वाचा – भाजपच्या फेक न्यूजना फेसबुकवर मोकळं रान!
गोव्यात कधी आला गोवंश हत्याबंदीचा कायदा?
गोवंश हत्याबंदी करणारं गोवा हे तर देशातलं पहिलं राज्य. 1978मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने पहिल्यांदा हा कायदा लागू केला. या कायद्याद्वारे गायींच्या कत्तलीवर कडक बंदी घालण्यात आली. त्यानंतर 1995मध्ये आलेल्या काँग्रेस सरकारनं हा कायदा अधिक कडक केला. यात कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. त्यानंतर बाजारात असलेल्या सर्व कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात आली. सरकारनं नेमलेल्या ठिकणीच फक्त गायींची कत्तल करता येते. मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या अडचण होत असलेल्याच जनावरांची कत्तल करण्याची मुभा गोवा सरकारानं दिलेली आहे. मात्र त्यासाठी कायदेशीर प्रमाणपत्र आधी मिळवावी लागतात. त्यानंतरच सरकारनं नेमून दिलेल्या ठिकाणीच अधिकृतपणे अशा जनावरांची किंवा मुख्यतः गायींची कत्तल करण्याची सोय गोवा सरकारनं केलेली आहे. यात प्रामुख्यानं गाय मरायला आली म्हणून तिची कत्तल करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यासाठी सरकारनं विशिष्ट असे नियम आणि अटी घातलेल्या आहेत. त्यासाठी पशुवैद्यांकडून विशेष प्रमाणपत्रही घ्यावं लागतं. यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्याचं समोर आल्यासच कत्तल करण्याची अधिकृत परवानगी दिली जाते. त्यामुळे दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य अभ्यासपूर्ण नसल्याचं निदर्शनास आलंय.