शिवसेना गोवाची ‘कोविड सेना’ कोविडबाधितांच्या मदतीला

शिवसेना गोवाकडून 'कोविड सेने'ची स्थापना; होम आयझोलेशनमध्ये असणाऱ्या कुटुंबांना देणार नॉन इमरजन्सी सेवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात सध्या कोविड महामारीने धुमाकूळ घातलाय. कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर संपूर्ण कुटुंबाची पंचाईत होते. अशावेळी जे कुटुंब विलगीकरणात असतं त्यांना विलिनीकरण कीट किंवा इतर जीवनावश्यक वस्तू हव्या असल्यास एक तर दुसऱ्यावर अवलंबून रहावं लागतं. किंवा निरुपाय म्हणून घरच्याच एखाद्या व्यक्तीला बाहेर जाणं भाग पडतं. त्यामुळे कोविड संक्रमण वाढ होण्याची शक्यता जास्त असते. हीच बाब लक्षात घेऊन शिवसेना गोवाने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. शनिवारी याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सचिव चेतन पेडणेकर आणि फोंडा तालुका प्रमुख अंबेश वेरेकर हजर होते.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची पहिली बैठक

कोविड सेनेची स्थापना

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होम आयझोलेशनमध्ये असलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी पर्यायी सोय सुविधा असली पाहिजे. ही गोष्ट सरकारला कित्येक वेळा प्रसिद्धी माध्यमांद्वारे सांगूनची त्या दृष्टीने कोणतीच ठोस पावलं किंवा कार्य प्रणाली आखण्यात आली नाही, अशी खंत शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आयझोलेशनमध्ये असलेल्या कुटुंबांना नॉन इमरजन्सी सेवा देण्यासाठी शिवसेना गोवाद्वारे कोविड सेना स्थापन करण्यात आली आहे.

नॉन इमरजन्सी सेवा

शिवसेना गोवाची कोविड सेना ही पूर्णतः नॉन इमरजन्सी सेवा आहे. होम आयझोलेशनच्या काळात काही जीवनावश्यक वस्तू किंवा औषधे वैगरे हवी असल्यास शिवसेनेच्या कोविड सेनेशी त्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन जितेश कामत यांनी केलंय. वस्तूंचं शुल्क युपीआय किंवा ऑनलाईन माध्यमातून केल्यावर कोविड सैनिक त्या वस्तूंची डिलिव्हरी मोफत करणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!