साळगावकर लॉ कॉलेजच्या प्रा. शिल्पा सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : फेसबुकवरील पोस्टमुळे विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या प्राध्यापक शिल्पा सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. फोंडा इथल्या राजीव झा यांनी तक्रार दाखल केली होती.
मिरामारच्या व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या प्राध्यापक शिल्पा सिंग यांचं सध्या नाव चर्चेत आलंय. शिल्पा यांनी हिंदू धर्मातील चालीरीतींविषयी समाजमाध्यमातून केलेल्या कथित टीकेवरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आक्षेप घेतलाय. शिल्पा यांना कॉलेज प्रशासनानं बडतर्फ करावं, अशी मागणी अभाविपनं केली असली, तरी कॉलेज व्यवस्थापनानं तसा निर्णय घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
ही कथित फेसबुक पोस्ट 2018 मध्ये शिल्पा सिंग यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर शिल्पा यांनी एका ऑनलाईन क्लासमध्ये एका विशिष्ट धर्मातील चालीरीतींना आक्षेप घेत टीका केली. या संदर्भात अभाविपच्या कोकण शाखेच्या सहसचिव प्रभा नाईक यांनी आक्षेप घेत कॉलेज प्रशासनाकडे शिल्पा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कॉलेज प्रशासनानं शिल्पा यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतर कॉलेज प्रशासनानं शिल्पा यांच्या विरोधात कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं अभाविप आता काय भूमिका घेतंय, याकडे लक्ष आहे.
प्रकरण पोहोचलं पोलिसांत
या विषयावर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्यात. फोंडा इथल्या राजीव झा यांनी शिल्पा यांच्या पोस्ट्स सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा दावा करून पोलिसांत तक्रार दिली होती. या संबंधी शिल्पा यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. झा यांनी आपल्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवरच त्यांनी आक्षेप घेत पोलिस संरक्षणाची मागणी केली.
ते माझं मॉब लिचिंग करतील
शिल्पा सिंग यांनी उजव्या संघटनांकडून मिळत असलेल्या धमक्यांचा उल्लेख करून उत्तर गोवा अधिक्षकांकडे तक्रार केली. ते माझं मॉब लिंचिंग करू शकतात, असं म्हणत पोलिस संरक्षण द्यावं, अशी मागणी केली. सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, मी शिकवत असताना मनुस्मृतीसह एम. एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर व रोहित वेमुला यांचा उल्लेख करण्याला विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. बिफसंदर्भातील आपल्या विचारांनाही त्यांचा विरोध असावा, असं त्या म्हणाल्या.
समितीची क्लिन चीट
अभाविपच्या आरोपानंतर या प्रकरणी चौकशीसाठी व्ही. एम. साळगावकर कॉलेज प्रशासनातर्फे समिती नेमण्यात आली. समितीनं चौकशी केल्यानंतर शिल्पा सिंग यांना कॉलेजमधून काढून टाकण्याची गरज नसल्याचा निर्वाळा दिला. ही माहिती प्राचार्य शाबीर अली यांनी माध्यमांना दिली. फेसबुक हा विषय कॉलेज प्रशासनाच्या अखत्यारित येत नाही. ती संबंधित व्यक्तीची खासगी बाब आहे, असं समितीनं नमूद केलंय.
‘बाहेरच्यांनी’ कशाला नाक खुपसावं?
कॉलेज प्रशासन समितीनं शिल्पा सिंग यांना क्लिन चीट देताना तक्रारदार तथा अभाविपच्या सहसचिव प्रभा नाईक या साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी नसल्याकडे लक्ष वेधलं. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी शिल्पा यांच्या विरोधात तक्रार केली असती, तर समजू शकतो. मात्र ‘बाहेरच्यांनी’ कॉलेजमधील विषयात नाक खुपसू नये, असं समितीनं नमूद केलंय.
आता अभाविप काय करणार?
शिल्पा सिंग यांच्यावर कारवाईसाठी अभाविपनं कॉलेज प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. मात्र कॉलेजनं त्यांना क्लिन चीट दिल्यानं आता अभाविप काय करणार, याकडे लक्ष आहे. शिल्पा यांना कॉलेजमधून बडतर्फ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अभाविपनं दिला होता.