गोव्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी प्रयत्न करणार – शेट्ये

भगीरथ शेट्येंची गोवा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवे चेअरमन म्हणून शिक्षण उपसंचालक भगीरथ शेट्ये यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. शिक्षण खात्याच्या प्रशासकीय विभागाचे उपशिक्षण संचालक पदी असलेले भगीरथ शेट्ये सोमवारी गोवा बोर्डाच्या चेअरमन पदाचा ताबा घेतला आहे. यापूर्वी गोवा बोर्डाचे सचिव म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडलेल्या भगीरथ शेट्येंकडे नव्याने गोवा बोर्डाची सूत्रं हाती आली आहेत.

हेही वाचाः वैद्यकीय व्यावसायिकांना आता क्षमतेवर आधारित शिक्षण

नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याचं आव्हान

नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याचं एक नवं आव्हान त्यांच्या समोर आहे. मात्र शिक्षण खात्यात वेगवेगळ्या पदावर यापूर्वी कार्यरत राहून आपल्या सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या शेट्येंनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू असा आत्मविश्वास आहे आणि तो त्यांच्या बोलण्यातून जाणवला. अगदी कोविड महामारीतही गोवा बोर्डाच्या १० वी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान तत्कालीन शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा बोर्डाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांच्या मार्गदर्शानाखाली त्यांनी लीलया पेललं होतं. इतकंच नव्हे तर गोव्याबाहेर महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्यात कोविड काळात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोव्याबाहेर परीक्षा केंद्रे सुरू करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली होती. तसंच वास्कोसारख्या कोविड प्रभावित क्षेत्रात अडकून पडलेल्या कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा गोवा बोर्डातर्फे घेऊन शेजारील राज्यातील सबंध त्यांनी अधिक दृढ केले होते. त्यानंतर शिक्षण उपसंचालक पदाचा ताबा घेतल्या नंतर कोविड सारख्या महामरीत गोव्याच्या शाळांतील ९ वी १० वी तसंच ११ वी १२ वीचे नियमित वर्ग सुरू करण्याचं धाडस सरकार मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री डॉ. प्रमोद सावंत तसंच शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांच्या मार्गदर्शन खाली त्यांनी दाखवलं. आज ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये आहे यातही त्यांची महत्वाची भूमिका आहे.

भगीरथ शेट्ये यांचा जीवन प्रवास

गावकरवाडा-कोरगाव येथील मध्यमवर्गीय शेट्ये कुटुंबात जन्मलेल्या भगीरथ शेट्ये यांचे वडील गोविंद शेट्ये हे कस्टममध्ये नोकरीला होते. घरच्या मंडळींकडून शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेल्याने विज्ञान शाखेची गोवा विद्यापीठातून भौतिक व रसायनशास्त्र यासारख्या अवघड विषयात त्याकाळी पदव्युत्तर पदवी मिळवत गोवा विद्यापीठात या विषयात सुवर्ण पदक प्राप्त केलं.

हेही वाचाः CA ते IAS प्रवास करणाऱ्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कत्याल

शैक्षणिक पार्श्वभूमी

पेठेचावडा कोरगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेत मराठी माध्यमात त्यांनी १ ली ते ४थी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर पेठेचावाडा येथील श्री कमळेश्वर हायस्कूलमध्ये ५ वी ते ७ वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर आपल्या घरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री कमळेश्वर हायस्कूल, देऊळवडा येथे ८ ते एस.एस्सी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यावेळी पेडण्यात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने कोरगाव सारख्या गावातून म्हापसा येथील सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. पुढे गोवा विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवली.

हेही वाचाः CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

विविध पदांवर केलं काम

जन्मजात हुशार असलेल्या भगीरथ शेट्ये यांना लागलीच हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रेड वन टीचरची जागा मिळाली. त्याठिकाणी त्यांनी प्राचार्य पदापर्यंत मजल मारली. नेहमी पुढे पुढे जाण्याचा दृढ संकल्प केलेल्या शेट्येंनी फक्त प्राचार्य पदावर समाधान न मानता गोवा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून गोव्याच्या शिक्षण खात्यात सहाय्यक शिक्षण संचालक पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर म्हापसा येथे विभागीय शिक्षण उपसंचालक, गोवा बोर्डात सचिव आणि सध्या शिक्षण खात्याचे प्रशासकीय उपसंचालक ही विविध पदं त्यांनी भूषवली. विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली त्यावेळी त्यांच्यासमोर प्रतिकूल परिस्थितीच होती. ही प्रतिकूल परिस्थिती अनुकुल परिस्थितीत बदलण्याचं कसब वेळोवेळी त्यांनी दाखवलं. म्हणूनच प्रतिष्ठेच्या पदावर त्यांची आज नियुक्ती होत आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

अध्यक्षपदी पोचणारे भगीरथ शेट्ये दुसरे

धारगळ पेडणेतून व्ही.डी.परब यांच्यानंतर पेडण्यातून गोवा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पोचणार भगीरथ शेट्ये दुसरे अधिकारी आहेत.

भगीरथ शेट्ये म्हणतात….

आपल्या या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले, पत्नी भाग्यश्री शेट्ये, जी शिक्षिका आहे, तिच्या पाठिंब्यामुळे गोवा शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी मी निभावू शकलो. सध्या विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला माझा मुलगा कौस्तुब याचाही माझा यशात खारीचा वाटा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं ग्रामदैवत श्री कमळेश्वर देवाची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळेच मी अजूनही माझ्या गावाशी असलेली माझी नाळ तोडलेली नाही. अजूनही श्री कमळेश्वराच्या आशीर्वादाने गोव्याच्या शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याचं कार्य तडीस नेण्याचा मला विश्वास आहे आणि या कार्यात मला शिक्षण क्षेत्रातील सर्वांचं सहकार्य मिळेल असा माझा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!