सम्राट क्लब केरीतर्फे शेटकर, पेडणेकरांचा सत्कार

१ ऑगस्ट रोजी पत्रकार दिनी शिरोली येथे सत्कार समारंभाचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरीः सम्राट क्लब केरी-सत्तरीतर्फे रविवार १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिरोली येथे पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सम्राट क्लब केरीचे सदस्य असलेले पत्रकार गणेश शंकर शेटकर आणि राघोबा लवू पेडणेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, गोवा पर्यटन खात्याचे उपसरव्यवस्थापक आणि सम्राट इंटरनॅशनल क्लबचे संचालक दिपक नार्वेकर, केरीचे सरपंच दाऊद सय्यद, सम्राट क्लब केरीच्या अध्यक्ष सरिता नंदा माजिक, सम्राट क्लबचे सल्लागार आणि राज्य शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक नंदा माजिक आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये शिरोली केरी सत्तरी येथील गणेश शंकर शेटकर आणि राघोबा लवू पेडणेकर यांचा समावेश आहे.

हेही वाचाः ऑक्सिजन मृत्यूच्या मुद्द्यावर भाजप सरकार स्वतःच्याच खोट्या जाळ्यात अडकलं

गणेश शेटकर यांनी पेंटिंग क्षेत्रातील व्यवसायानंतर २००५ मध्ये ‘तरुण भारत’चे पर्ये वार्ताहर म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. ‘गोवादूत’साठी साखळी प्रतिनिधी म्हणून काही काळ काम केल्यानंतर गोवादूत पणजी कार्यालयात त्यांनी नोकरी केली. २००७ मध्ये ‘सुनापरान्त’ या कोकणी वर्तमानपत्रातून छाया पत्रकारितेला प्रारंभ केला. ते माहिती खात्याचे अधिमान्यता नोंदणीकृत छाया पत्रकार असून सध्या ‘लोकमत’ या मराठी वृत्तपत्रात वरिष्ठ छायापत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना छायापत्रकारिता आणि कला आणि संस्कृती लेखनासाठी २०१७ , २०२० सालचा गोवा सरकारचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच २००७ , २००९ आणि २०१९ साली गोवा श्रमीक पत्रकार संघटनेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पारनेर अहमदनगर महाराष्ट्र, सप्तसुर अभिनव संस्थेतर्फे कला गौरव पुरस्कार, नेहरु युवा केंद्र पणजीतर्फे जिल्हा युवा पुरस्कार, दक्षिण गोवा पत्रकार संघटनेतर्फे सन्मान तसंच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक संस्थांतर्फे त्यांचा गौरव केला आहे. गोवा छाया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या पत्रकार अधिमान्यता समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आहे. फोटोग्राफी क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर इतर अनेक बक्षिसे त्यांना प्राप्त आहेत. ग्रामीण लोकजीवनावर आधारीत ‘सुनापरान्त’मध्ये केलेल्या लेखमालेवरील त्यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.

हेही वाचाः गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे ‘गूज पत्रकार’ पुरस्कारांची घोषणा

राघोबा लवू पेडणेकर हे शिरोली केरी सत्तरी येथील असून १९९८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं आहे. काहीकाळ अनेक ठिकाणी त्यांनी विद्यादान केलं असून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी विविधा ठिकाणी शेकडो कार्यशाळा घेतल्या आहेत. व्यक्तिमत्व विकासावरही अनेक ठिकाणी कार्यशाळा, विविधा प्रकारच्या स्पर्धांचं परीक्षण त्यांनी केलं आहे. अनेक संस्थांमध्ये ते वेगवेगळी पदं भूषवत आहेत. त्यांचा ‘वात’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांना पदभ्रमणाची आवड आहे. अनेक ठिकाणी त्यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव केला आहे. सध्या ते पर्ये साखळी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!