कोणी राखली मुख्यमंत्री शशिकलाताई सरकारची पत?

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळाच्या दि.1 जून 1977 रोजी झालेल्या चौथ्या विधिमंडळ निवडणुकीत पहिल्याच खेपेला निवडून आलेले थिवी मतदारसंघाचे मगो आमदार अॅड. दयानंद गणेश नार्वेकर व रिवण मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले मगो आमदार दिलखुष फोटू देसाई यांनी मगो कार्यकारिणी व मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर (Shashikala Kakodkar) यांच्या नेतृत्वाला शह देण्याचा वारंवार प्रयत्न केला.
पक्षविरोधी कारवायाची दखल
अॅड. दयानंद नार्वेकर (Dayanand Narvekar) व दिलखुष देसाई (Dilkhush Desai) यांनी सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्या बद्दल मगो पक्ष कार्यकारिणीने या दोन्ही आमदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. दि. 21 जानेवारी 1979 रोजी झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांनी कार्यकारिणीच्या इतर सदस्यांच्या नजरेत या दोन्ही आमदारांच्या जून 1977 पासून सुरू असलेल्या पक्षविरोधी कारवाया आणून दिल्या होत्या. विधिमंडळात या दोन्ही आमदारांनी घेतलेली पक्षविरोधी भूमिका, सरकार विरोधी बेजबाबदार वक्तव्ये, श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाला शह देत सरकार पाडण्याचे केलेले प्रयत्न यांची सर्व माहिती श्रीमती शशिकलाताई यांनी मगो पक्ष कार्यकारणी सदस्यांना दिली होती. पुढे मग दि. 26 जानेवारी 1979 रोजी दिलखुष देसाई यांच्या रिवण मतदारसंघात मगो पक्षाच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून त्यांचे आमदार दिलखुष देसाई हे पक्षविरोधी कारवाया करीत मगो नेतृत्वाच्या विरोधात कशाप्रकारे बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत, याची माहिती दिली होती. मगो पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल परंतु या आमदारद्वयींच्या पक्षविरोधी कारवायांना व स्वार्थी राजकारणाला पक्ष भीक घालणार नाही की शरणागती पत्करणार नाही, अशा शब्दात त्यांनी त्यांची निर्भत्सना केली होती. अॅड. दयानंद नार्वेकर व दिलखुष देसाई यांना नंतर साथ देणारे कायदामंत्री अॅड. शंकर लाड यांनी या बैठकीस हजर राहून शशिकलाताई यांची बाजू घेतली होती. तसेच, आमदार दयानंद नार्वेकर व दिलखुष देसाई यांची कृती दुर्दैवी व बेजबाबदार असल्याचे वक्तव्य करीत श्रीमती शशिकलाताईंना साथ दिली होती. लाड यांनी मगो पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांना या बैठकीत दिलेली साथ पाहता भविष्यात ते बंडाचे नेतृत्व करतील, असा विचार सदर बैठकीला उपस्थित मगो कार्यकर्त्यांनी स्वप्नातही केला नसेल. दुर्दैवाने पुढे तसेच घडले आणि सरकार कोसळले.
पीठासीन अध्यक्षांचे निर्णायक मत
दि 16 मार्च 1979 रोजी विरोधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते मडगाव मतदार संघाचे आमदार अनंत नृसिंह नायक यांनी सिनेमा तिकिटांचे दर 30 टक्क्यांनी कमी करावेत, अशी मागणी करणारा खासगी ठराव विधिमंडळात मांडला होता. या खासगी ठरावाला मगो आमदारद्वयी दयानंद नार्वेकर व दिलखुष देसाई यांनी पाठिंबा दिला. परिणामी मतदान मोजणी अंती ठरावास 14 – 14 अशी समान मते मिळाल्याचे सिद्ध झाले. पीठासीन अध्यक्ष नारायण फुग्रो यांनी आपले निर्णायक मत सरकारच्या बाजूने ठरावाच्या विरोधात दिल्यामुळे काँग्रेसचे विधिमंडळ नेते अनंत नायक यांचा हा ठराव फेटाळला गेला व सरकारची पत काही प्रमाणात राखली गेली.
दि. 21 मार्च 1979 रोजी सरकारने विधिमंडळात आणलेली चार विधेयके बहुमताने मंजूर झाली होती आणि या विधेयकावरील मतदानाच्या वेळी बंडखोर आणि सडेतोड म्हणून गाजलेले मगो आमदार दयानंद नार्वेकर व दिलखुष देसाई यांनी आश्चर्यजनकरीत्या सरकारबरोबर राहून विधेयकांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, याच आमदार जोडगळीने दोन दिवस उलटताच पुन्हा दि. 23 मार्च 1979 रोजी विरोधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुडतरी मतदारसंघातून निवडून आलेले व पेशाने शिक्षक असलेले विधिमंडळ सदस्य फ्रान्सिस्को सार्दिन यांनी कूळ कायद्याला दुरुस्ती सुचवणारे विधेयक सभागृहात मांडण्याची परवानगी मागितली असता पक्षाशी बंडखोरी करीत पाठिंबा दिला होता. यामुळे विधिमंडळात मगो सरकारला पराभव पत्करावा लागला होता.