गोव्यातही घडणार चमत्कार, मोर्चेबांधणीसाठी पवार गोव्यात

आगामी निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी शरद पवार गोव्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक गाजवणारे राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार गोव्यात दाखल झाले आहेत. ते जरी खाजगी भेटीवर आले असले तरी ते या भेटीत गोवा प्रदेश राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीसोबत आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील चमत्कार गोव्यातही घडेल काय, असा प्रश्न अनेकजण विचारताहेत. गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची किमया ही फक्त शरद पवारांतच आहे, हे देखील भाजप विरोधी पक्षांना आता पटलंय. ह्याच अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती निश्चित केली जाईल, असा विश्वास प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजीमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी व्यक्त केलाय.

कशामुळे महत्त्व?

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांना कशा पद्धतीनं सामोरं जाणार आहे, याबाबत सविस्तर रणनिती ठरवली जाईल. विधानसभा निवडणुकांआधी राज्यात पालिका निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. त्यानंतर अवघ्या महिन्यातच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळेल. या पार्श्वभूमीवर आतापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शरद पवारांचा गोवा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.

कुणासोबत आघाडी?

मंगळवारीच ते गोव्यात दाखल झालेत. ही त्यांची खाजगी भेट आहे. बुधवारी ते कारवारला गेलेत. तिथून ते थेट प्रदेश राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल होतील. तिथे राष्ट्रवादीचे कार्यकारि सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना ते संबोधीत करतील. आगामी विधानसभेसाठी आघाडी स्थापन करण्यासंबंधी आत्ताच निर्णय होणे गरजेचे आहे, हे आपण यापूर्वीच साहेबांना आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना सांगितल्याचे डिसोझा म्हणाले.

समविचारी पक्षांसोबत आघाडी स्थापन करायची असेल तर आत्ताच त्यासंबंधीचे नियोजन व्हावे लागेल. शेवटच्या क्षणी आघाडीसाठी धडपड केल्यानंतर त्याचे गैरपरिणाम दिसून येतात. आपण ही गोष्ट पुन्हा एकदा त्यांच्या नजरेला आणून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात भाजपला रोखायचे असेल तर फक्त शरद पवार हेच ते करू शकतात असा विश्वास आता सर्वंच भाजप विरोधकांना वाटत असल्याने राष्ट्रवादी त्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहितीही यावेळी सुत्रांनी दिली. काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. या व्यतिरीक्त भाजपातीलही काही नेते राष्ट्रवादीकडे जवळीक साधून आहेत. भाजपातील नाराज घटकांचाही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संवाद सुरू असल्याने आगामी काळात भाजपला पर्याय म्हणून राष्ट्रवादीच उभी राहील,असेही या नेत्यांचे ठाम म्हणणे आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!