शाहरूख खानचा उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज

अमली पदार्थ विरोधी पथकाने राज्यातील तस्करी प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी संशयितांच्या मागे ससेमिरा लावला आहे.

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : देशात अमलीपदार्थ सेवन व तस्करी प्रकरणी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने राज्यातील अमली पदार्थ विरोधी पथकाने तस्करी प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी संशयितांच्या मागे ससेमिरा लावला आहे. याची कुणकूण लागल्यानंतर ताळगाव येथील शाहरूख खान याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 5 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने 24 रोजी मध्यरात्री दिवाडी येथील एका गॅरेजवर छापा टाकून एदुआर्द पिंटो या युवकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पथकाने 2 लाख 50 हजार रुपये किमतीचा 2 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणात खान याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना लागली होती.

खान याला पथकाने 4 मे 2016 रोजी रात्री साळगाव येथील जंक्शनजवळ पथकाने तस्करी प्रकरणी रंगेहाथ पकडले होते. त्याच्याकडून 0.12 ग्रॅम एलएसडी आणि चरस जप्त केले होते. त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून 5 मे 2016 रोजी अटक केली होती. त्याला 25 मे 2016 रोजी 25 हजार रुपयांच्या हमीवर व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर झाला होता.

दरम्यान, या प्रकरणाचा खटला म्हापसा येथील विशेष न्यायालयात सुरू असून पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्यासाठी पथक खान याच्या मागे लागले होते. खान याने उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!