मध्य प्रदेशातल्या ‘विक्रमी’ लसीकरणात ‘सावळा गोंधळ’

एकाच दिवशी 17 लाखांहून अधिक लसीकरणाच्या विक्रमाचा पर्दाफाश !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : केंद्र सरकारने सर्वांसाठी मोफत लस देण्याचं धोरण २१ जून २०२१ पासून लागू केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं. खास करुन भाजपाशासित राज्यांमध्ये टिका उत्सव म्हणत मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घेण्यासंदर्भात राज्य सरकारांनीच पुढाकार घेतल्याचं चित्र दिसलं. मध्य प्रदेशने या लसीकरणामध्ये १७ लाख लसी एकाच दिवशी देण्यात आल्याचा दावा केला. मात्र आता या लसीकरणामधील नवीन गोंधळ समोर येत असून लस न घेतलेल्या व्यक्तींना एसएमएसवरुन लस घेतल्याची माहिती देणे, एकाच व्यक्तीला तीन अनोळखी लोकांच्या नावाच्या लसीकरण प्रमाणपत्रांची लिंक पाठवणे, सरकारी कामांसाठी दिलेल्या कागदपत्रांवरुन लस न घेताच लस दिल्याचं प्रमाणपत्र मिळणं, असा गोंधळ समोर आलाय.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १७ लाखांहून अधिक जणांना एकाच दिवशी लस देण्यात आल्याचा दावा २१ जूनच्या लसीकरणासंदर्भात बोलताना केला. मात्र ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार राज्यभरामध्ये अनेक अशी प्रकरणं समोर आली आहेत जिथे लोकांना लस न घेताच त्यांना प्रमाणपत्र आणि लसीकरण यशस्वी झाल्याचे मेसेज आले आहेत. या सर्व गोंधळामुळे सरकारने विक्रमी लसीकरणाचा केलेला दावा हा संभ्रमात टाकणारा, फसवणूक करणारा असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत.

भोपाळमध्ये राहणाऱ्या नुजहत सलीम यांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज आला. मात्र त्यांनी लस घेतलीच नव्हती. नुजहत यांना २१ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या आसपास एक मेसेज आला. यामध्ये तुमचं लसीकरण पूर्ण झालं आहे असं सांगण्यात आलेल. या लसीकरणासाठी ओळखपत्र म्हणून पेन्शनशी संबंधित कागदपत्रांवरील माहिती देण्यात आलेली. धक्कादायक बाब म्हणजे नुजहत यांना पेन्शनच्या कागदपत्रांच्या आधारे पेन्शन दिलं जात नाही, तरी त्याचा वापर करुन लसीकरण झाल्याचं दाखवण्यात आलंय.

अशा पद्धतीने चुकीच्या माहितीच्या आधारे लसीकरणाची नोंद झाल्याचं हे काही एकमेव प्रकरण नाहीय. २१ जून रोजीच सतना येथे राहणाऱ्या चैनेंद्र पांड्ये यांच्यासोबतही असाच प्रकार घडला. पांड्ये यांना पाच मिनिटांमध्ये तीन मेसेज आले. या तिन्ही मेसेजमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आल्याची माहिती देत लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या लिंक पाठवण्यात आलेल्या. आपण या तीनपैकी एकाही व्यक्तीला ओळखत नसून हे मेसेज मला कसे आले याचं कोडं उलगडलं नाहीय, असं पांड्ये म्हणाले.

मध्य प्रदेश काँग्रेसने कोरोना लसीकरणासंदर्भातील या गोंधळावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी अशाप्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सरकारने विक्रमाच्या नादात आकडेवारीमध्ये मोठा गोंधळ घातल्याचा आरोप सलूजा यांनी केलाय. मध्य प्रदेशमधील १३ वर्षाच्या मुलाला आणि मरण पावलेल्यांचंही लसीकरण करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. बैतूलमधील ४७ गावांमध्ये एकाही व्यक्तीचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. रेकॉर्ड हा केवळ दावा आहे, असंही सलूजा म्हणाले.

२१ जून रोजी म्हणजेच मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या लसीकरण उत्सवाच्या दिवशी भोपाळमध्ये राहणाऱ्या १३ वर्षीय वेदांत नावाच्या मुलाचं लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. लसीकरणाचा प्रमाणपत्रावर या मुलाचं वय ५६ दाखवण्यात आलं आहे. वेदांतचे वडील रंजीत डांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक एसएमएस आला. या एसएमएसमध्ये वेदांतला लस देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं. वेदांत केवळ १३ वर्षांचा असून देशात लहान मुलांचं लसीकरण अद्याप सुरु झालेलं नाही. यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न रंजीत यांनी केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. या मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या लिंकवर लसीकरणाचं प्रमाणपत्र रंजीत यांनी डाऊनलोड केलं असता वेदांतच्या नावाने लसीकरण करण्यात आल्याचं प्रमाणपत्र बनवताना काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये अन्य एका कामासंदर्भात जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन माहिती घेण्यात आल्याचं उघड झालं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!