लोकशाहीचा मार्गदर्शक हरपला ; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरा वेळा निवडून आले. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता.
चार पिढ्यांतील मतदारांशी नाळ जोडणारे गणपतराव देशमुख हे साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी ओळखले जात. विधिमंडळात अनेक विधेयकांवर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आजही संस्मरणीय ठरतात. मनोहर जोशी व नारायण राणे यांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जवळपास सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला.