ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचं निधन

१५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचं भूषवलं अध्यक्षपद

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचे सकाळी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. जयंत पवार यांना शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे-पवार  व मुलगी असा परिवार आहे.

परखड भाष्यकार, नाटककार आणि लेखक अशी जयंत पवार यांची ख्याती होती. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. २०१४ च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ च्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

जयंत पवार यांनी अधांतर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, काय डेंजर वारा सुटलाय, पाऊलखुणा, बहुजन संस्कृतीवाद आणि लेखक, दरवेशी, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, माझे घर, वंश, शेवटच्या बीभस्ताचे गाणे, होड्या, वरण भात लोन्च्या अन कोण काय कोन्च्या, असे साहित्य लिहिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!