LOCKDOWN | मांद्रे पंचायतीकडून सेल्फ लॉकडाऊन जाहीर

5 ते 9 मे पर्यंत लॉकडाऊन; जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत खुली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे पंचायतीने बुधवार 5 मे ते रविवार 9 मे पर्यंत सेल्फ लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात जीवनावश्य वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 12.30 या वेळेत खुली राहणार आहेत. कुणाचीच कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यासाठी मांद्रे कोविड टास्क फोर्स समिती कार्यरत राहणार असल्याची माहिती, मांद्रेच्या सरपंच अश्वेता मांद्रेकर यांनी दिली.

हेही वाचाः लॉकडाऊनच्या नावाखाली अत्यावश्यक सेवा बंद करू नका

5 दिवस लॉकडाऊन

मांद्रेत कोरोना संसर्ग वाढत असल्याने सर्व पंचायत मंडळ, नागरिक, सामाजिक संस्था आदींशी विचार विनिमय करून कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी 5 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मांद्रेकर म्हणाल्या. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, भाजीपाला दुकानं सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत सुरू असणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सामान मिळणार नाही असं म्हणत लोकांनी दुकानांवर गर्दी करू नये, असं आवाहन मांद्रेकर यांनी केलंय.

मांद्रे सरपंच अश्वेता मांद्रेकर

अत्यावश्यक सेवा सुरू

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी तोंडावर मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, सॅनिटायझर वापरणं अशा नियमांंचं ग्रामस्थांनी पालन करावं, असं आवाहन सरपंच अश्वेता मांद्रेकर यांनी केलं. या काळात डॉक्टर, क्लिनिक, फार्मसी, आपत्कालीन सेवा 24 तास सुरू राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचाः वेर्ला-काणकानंतर इतरही ग्रामपंचायतींचा कॉन्फिडन्स वाढला! कुठ्ठाळीतही निर्णय झाला

मांद्रेत कोरोनाचे 74 सक्रीय रुग्ण

मांद्रे पंचायत क्षेत्रात 8 एप्रिल ते 3 मे या कालावधीत नवीन 88 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 74 सक्रीय कोरोना रुग्ण सध्या मांद्रेत आहेत. जुनासवाडा 20, आस्कावाडा 8, दांडोसवाडा 16, देवूळवाडा 1, गावडेवाडा 9, नाईकवाडा 16, सावंतवाडा 3 तर साळगावकर वाडा 1 मिळून एकूण 74 सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद मांद्रेत आहे.

ओंकार थिएटरची मदत

नाट्यक्षेत्रात अग्रेसर असलेल्या ओंकार थिएटर पेडणे या संस्थेने मांद्रे कोविड टास्क फोर्स समितीला पाच हजार रुपयांची मदत केली आहे. ही समिती कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करत असल्यानं संस्थेचे पदाधिकारी आणि नाट्यकर्मी वकील अमित सावंत यांच्या मदतीशिवाय अन्द्रू फर्नांडिस यांनी पाच हजार रुपये मदत म्हणून समितीला दिले असल्याचं मांद्रेकर म्हणाल्या.

हेही वाचाः LOCKDOWN | डिचोलीत 5 दिवस पूर्ण लॉकडाऊन

पंचायत मंडळाच्या निर्णयाचं स्वागत

मांद्रे पंचायत मंडळाने मंगळवारपासून 5 दिवस लॉकडाऊन करण्याचा जो निर्णय घेतला त्याचं पंचायत पातळीवरून जोरदार स्वागत केलं जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे लॉकडाऊन करण्यास हरकत नाही, मात्र जीवनावश्यक वस्तूंची अडचण होऊ नये. वकील अमित सावंत, वकील प्रसाद शहापूरकर, जगन्नाथ पार्सेकर, सद्गुरू नाईक, राघोबा गावडे आदींनी स्वागत करून लॉकडाऊन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!