अधिवेशनाचा आखाड्यातील पहिला दिवस- एक अहवाल आणि बाकी निराशाच

राज्यपालांचं झटपट भाषण आणि फटाफट कामकाज तहकूब

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आजपासून ४ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या अगोदरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान पेटलंय. त्यामुळे पुढच्या दिवसांमध्ये अधिवेशनाच्या कामाकाजादरम्यान काय होणार आहे हे पाहाणं औत्सुकपूर्ण असणार आहे. विधानसभेच्या पहिला सत्रातील कामकाजाचा पहिला दिवसही मनोरंजक ठरला. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यपालांनी अभिभाषण आटोपलं

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अभिभाषण सादर केलं. राज्यपाल भाषणात काय सांगतात यासाठी सगळेच उत्सुक होते. पण राज्यपाल कोश्यारींनी प्रकृतीच्या कारणास्तव फक्त ३ मिनीटं भाषण करून पुढील भाषण विधानसभेच्या पटलावर ठेवून ते निघून गेले. यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

राज्यपालांच्या भाषणावेळी विरोधकांची पोस्टरबाजी

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचं भाषण सुरू असताना विरोधक आक्रमक झाले. विरोधक काळ्या फेती बांदून सभागृहात आले. आणि त्यांनी ‘गोयांत कोळसो नका’चे फलक झळकावले. राज्यपालांच्या भाषणात कोळश्याबद्दल एकही उत्तर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी काहीकाळ सभागृहात गोंधळ घातला.

विधानसभा अधिवेशन बुधवार सकाळपर्यंत तहकूब

विरोधकांनी विधानसभेत केलेल्या गोंधळानंतर विधानसभेच्या पहिला सत्रातील कामकाजाला सुरुवात झाली होती. कामकाजात सल्लागार समितीचा अहवाल सादर करण्यात आला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यावेळी आक्रमक झाले. ‘कोळसा नकोच’ म्हणत विजय सरदेसाईंनी संताप व्यक्त केला. तसंच चर्चील आलेमाव, सुदीन ढवळीकर यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली. या सगळ्यामुळे सभागृत कामकाज सल्लागार समितीचा अहवाल गदारोळात संमत झाला. आणि विधानसभा अधिवेशन बुधवार सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यामुळे स्वाभाविकपणे उरलेले तीन दिवस तरी विरोधक कामकाज होऊ देतील का, यावर सवाल उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता बुधवारी नेमकं कामकाज किती होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!