खाऱ्या समुद्राची ‘गोड बातमी’ आणि इस्राईलचं ‘मराठी ट्विट’

मुंबईत नि:क्षारीकरण प्रकल्पातून 2025 ला होणार शुद्ध पाणी पुरवठा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : समुद्रकिनारा लाभलेल्या गोव्यासह अन्य राज्याचंही लक्ष वेधणारी ही बातमी आहे. मुंबईच्या समुद्रातील पाणी गोडे करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं एक पाऊल पुढं टाकलंय. या संदर्भात मुंबई महानगरपालिका व आय. डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीस या इस्रायली कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. या करारानंतर इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानं मराठीमध्ये ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा करार झाला. त्यानुसार या प्रकल्पासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. या करारामुळं स्वप्नपूर्तीचा आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतिकारी पाऊल आहे. जगात काही देशांनी यापूर्वीच समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करण्यास मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतु त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असताना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे. २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरू होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक ट्वीटही केलं होतं. याच ट्वीटला टॅग करत इस्रायली दूतावासानं मराठीत ट्वीट केलं आहे. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे,’ असं इस्रायलनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ट्वीटमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग करण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!