कला अकादमीच्या नूतनीकरणात घोटाळा

गोवा फॉरवर्डचा आरोप : उच्च न्यायालयात जाण्याचाही इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरण कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करून यासंदर्भात गोवा फॉरवर्ड उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असा इशारा पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी बुधवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

हेही वाचाः मॉविनविरुद्ध एलिनाही आक्रमक

यातच कला आणि संस्कृती खाते आणि खात्याच्या मंत्र्यांनी घोटाळा केला आहे

कोविड काळात राज्यात आर्थिक स्थिती कोलमडल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. अशा परिस्थितीतही कला अकादमीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय १० फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आला. त्यानंतर ४ जून २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली. २९ ऑक्टोबर २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे ३६.८७ कोटींचे केवळ एकपानी अंदाजपत्रक कला आणि संस्कृती खात्याला सादर केले. या ३६.८७ कोटींमध्ये पाच वर्षांचे देखभाल शुल्क म्हणून २.७६ कोटी, १२ टक्के जीएसटीचे ४.७४ कोटी, राईट एजन्सीची ५१ लाख रुपयांची फी, ७ टक्के डिपार्टमेंटल शुल्क धरून ही रक्कम सुमारे ४९.५७ कोटींवर नेण्यात आली. यातच कला आणि संस्कृती खाते आणि खात्याच्या मंत्र्यांनी घोटाळा केला आहे, असा आरोप कामत यांनी केला.

सदर कंत्राट तत्काळ रद्द करा

नूतनीकरण प्रक्रियेसाठी इतका वेळ जाणार हे माहीत असतानाही सरकारने कला अकादमीसाठी निविदा जारी केली नाही. यावरूनच मुख्यमंत्री आणि कला आणि संस्कृती खात्याच्या मंत्र्यांना यात घोटाळा करायचा होता हे स्पष्ट होतं, असं ते म्हणाले. कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी मुंबई येथील टेक्नॉम बिल्डिंग प्रा. लि. कंपनीची नेमणूक केली होती. २१ मार्च २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील फाईल मंजुरीसाठी आली; पण त्यात या कंपनीचं नावच नव्हतं. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने १२ एप्रिल २०२१ रोजी सदर कंपनीला कला अकादमीच्या कामासाठी नियुक्त केल्याचं पत्र पाठवलं. त्याच दिवशी त्या कंपनीने सरकारला पत्र पाठवून होकार कळवला. ही प्रक्रिया इतक्या जलदगतीने कशी काय झाली, कामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीचं नाव मंत्रिमंडळाला का सांगण्यात आलं नाही, नूतनीकरण कामाची निविदा का काढण्यात आली नाही, असे अनेक सवाल कामत यांनी उपस्थित केले. सदर कंत्राट तत्काळ रद्द करण्याची आणि कंत्राटदाराला कामाची​ रक्कम वितरीत न करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचाः केरी सत्तरीत अपघात, ६ महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू, आता अपघातात वडिलांना गमावलं

आरोप सिद्ध करून दाखवा : गावडे

कला अकादमीच्या नूतनीकरण कामाबाबत गोवा फॉरवर्डने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. निवडणूक जवळ आल्यानं राजकीय स्टंट म्हणून फॉरवर्ड असे आरोप करत आहे, अशी टीका कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केली. मुळात या कामाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शिवाय कामासाठी नोडल एजन्सी म्हणून ​नियुक्त केलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कामाचे सोपस्कारही सुरू आहेत. गोवा फॉरवर्डने आपले आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही मंत्री गावडे यांनी दिले.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MANOJ PARAB BIRTHDAY | आरजी क्रांतीसाठी सज्ज- मनोज परब

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!